मुंबईकरांचे आरोग्य पुन्हा धोक्यात; लिंबू सरबत, उसाचा रस यांमधील 81 टक्के बर्फ दुषित
मात्र नुकत्याच केल्या गेलेल्या तपासणीत अशा पेयांमध्ये वापरले जाणारा 81 टक्के बर्फ हा दुषित असल्याचे आढळले आहे
काही दिवसांपूर्वी मुंबई शहरातील कुर्ला रेल्वे स्थानकावर, गलिच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत हे दुकान बंद करीत, उघड्यावरील अन्नपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली. सध्या उन्हाळ्यात बाहेर सरबत, थंड पेये, उसाचा रस अशा गोष्टींचे सेवन केले जाते. मात्र नुकत्याच केल्या गेलेल्या तपासणीत अशा पेयांमध्ये वापरले जाणारा 81 टक्के बर्फ हा दुषित असल्याचे आढळले आहे. म्हणजेच पुन्हा एकदा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एप्रिल महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने 24 विभागांमधील फेरीवाल्यांकडील लिंबू सरबते आणि उसाच्या रसाच्या नमुन्यांची तपासणी केली होती. यामध्ये 81 टक्के नमुने दुषित आढळले आहेत, मार्च मध्ये हेच प्रमाण 87 टक्के इतके होते. याचा अर्थ अशाप्रकारे उघड्यावरील सरबत पिणे हे आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक ठरू शकते. हे बर्फ 'आईस फॅक्टरी’मध्ये तयार होत असते, तिथे ते कोणत्या अवस्थेत तयार होत आहे याची तपासणी करून अन्न व औषध प्रशासन विभाग त्यावर कारवाई करू शकते. (हेही वाचा: कुर्ला रेल्वे स्थानकावरील परवानाधारक लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड)
मार्चमध्ये केलेल्या तपासणी मध्ये 156 बर्फाच्या नमुन्यांपैकी 141 नमुने दुषित होते. तर एप्रिलमध्ये 385 पैकी 300 नमुने दुषित आढळले आहेत. सोबतच उसाचे रसाच्या 303 नमुन्यांपैकी 268 नमुने दुषित आढळले आहेत. त्यामुळे उसाचा रस हा आरोग्यदायी असतो असे समजणे हे पूर्णतः चुकीचे आहे.