Mumbai: धावत्या गाड्यांमधून खाली पडून झालेल्या मृत्यूंच्या संख्येत 2022 मध्ये लक्षणीय वाढ; रुळांवरील अतिक्रमणामुळे ठाण्यात सर्वात जास्त मृत्यू
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दाट लोकवस्तीच्या निवासी वसाहती आणि रुळांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्या ही देखील मोठी डोकेदुखी बनली आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) रेल्वे रुळांवर (Railway Tracks) होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात असतानाही, 2022 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) च्या उपनगरीय विभागात रेल्वे रुळांवरील अतिक्रमणामुळे 1,118 लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये मृत्यूची संख्या 1,114 इतकी होती. मात्र, धावत्या गाड्यांमधून खाली पडून झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
2022 मध्ये रेल्वेमधून खाली पडून झालेल्या अपघातात 700 जणांचा मृत्यू झाला, तर मागच्या वर्षी ही संख्या 277 होती. 2019 मध्ये, अशा 611 मृत्यूची नोंद झाली होती, तर 2020 मध्ये (कोविड लॉकडाऊन दरम्यान आणि वर्षाच्या बहुतांश भागात ट्रेन नसल्याने) 177 मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या वर्षी ट्रेनशी संबंधित मृत्यूंची एकूण संख्या 2,507 होती.
रेल्वे रुळांवरील अतिक्रमणामुळे 2022 मध्ये सर्वाधिक मृत्यू (127) मुलुंड आणि मुंब्रा दरम्यान ठाण्यात नोंदवले गेले, त्यानंतर कुर्ला जीआरपी कार्यक्षेत्रात 101 आणि त्याचप्रमाणे मध्यवर्ती भागातील कल्याण-कसारा आणि बदलापूर विभागात 99 मृत्यू झाले. पश्चिम मार्गावर, बोरिवली विभागात 2022 मध्ये सर्वाधिक अतिक्रमण मृत्यू (140) झाले, त्यानंतर वसई विभागातील वसई-नालासोपारा आणि विरार भागात 102 मृत्यू झाले.
याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी 'शून्य मृत्यू' मिशन ठेवले आहे. त्यामुळे 2020-21 मध्ये 15 नवीन फूट ओव्हरब्रिज आणि 2021-22 मध्ये 12 नवीन फूट ओव्हरब्रिज सुरू केले. तसेच, 2021-22 मध्ये 17 नवीन एस्केलेटर आणि 2021-22 मध्ये 10 नवीन लिफ्ट कार्यान्वित करण्यात आल्या. रेल्वे संरक्षण दल, जीआरपी आणि अभियांत्रिकी विभागाच्या पूर्वीच्या संयुक्त सर्वेक्षणादरम्यान, लोकांनी अतिक्रमण केलेली 73 ठिकाणे ओळखण्यात आली होती, त्यापैकी 66 कायमची बंद करण्यात आली आहेत आणि सात बंद होण्याच्या प्रगतीपथावर आहेत. (हेही वाचा: Mumbai Local Update: गोखले पुलाच्या तोडणीसाठी रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक, जाणून घ्या अधिक तपशील)
गेल्या वर्षी 9 ते 19 सप्टेंबर दरम्यान नवीन संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले व त्यामध्ये 205 अतिक्रमण ठिकाणे ओळखण्यात आली. दरम्यान, अतिक्रमण-संबंधित अपघातांचा ट्रेन ऑपरेशनवरही वाईट परिणाम होतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दाट लोकवस्तीच्या निवासी वसाहती आणि रुळांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्या ही देखील मोठी डोकेदुखी बनली आहे.