Mumbai-North-East Lok Sabha Constituency: राऊत नव्हे,  ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांची 'या' संजयला पसंती?

मात्र, पक्षप्रमुखांनी राऊत यांच्याऐवजी संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या नावाल पसंती दिल्याचे समजते.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ( (Shiv Sena-UBT) पक्ष महाविकासाघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मुंबईतील एकूण सहापैकी चार जागांवर दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय आढवा घेतला जात आहे. अर्थात कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती दिली गेली नसली तरी, ईशान्य मुंबईतून लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारही निश्चित केल्याचे समजते. या मतदारसंघातून खरेतर राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षप्रमुखांनी राऊत यांच्याऐवजी संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या नावाल पसंती दिल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर येऊन ठेपली असताना राज्याच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे तो राज्याच्या राजकारणाचा विचका झाला आहे. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा घेऊनही सत्तेत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले. ते सत्तेत सहभागी झाले. असे असले तरी, राज्य सरकार लंगडेच आहे. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेली कांग्रेस गतप्राण आवस्थेतून सावरत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पुन्हा एकदा नव्याने बांधणी करु पाहतो आहे. अशा पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांचा आढवा घेतला जातो आहे. उद्धव ठाकरे हे महाविकासआघाडीमध्ये मुंबईतील एकूण सहा पैकी चार जागांवर इच्छुक आहेत. त्यानुसार त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मात्र, मधल्या काही काळामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला. आजही ते ठाकरेंसोबतच आहेत. पाटील हे 2004 मध्ये आमदार तर 2009 मध्ये खासदार होते. आता त्यांना जर ठाकरे गटाने लोकसभेच्या मैदानात उतरवले तर त्यांची लढत कोणाशी होते याबाबत उत्सुकता आहे. तसेच, मविआमधून हा उमेदवार सर्वमान्य होतो का हेही पाहावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे संभाव्य उमेदवार

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ- अरविंद सावंत (विद्यमान खासदार)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ- अमोल किर्तीकर

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ- संजय दिना पाटील (माजी आमदार, खासदार)

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ- (अद्याप नावनिश्चीती नाही)

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवेसेना, भाजप युती होती. युतीच्या जागावाटपात त्या वेळी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला होता. या मतदारसंघातून भाजपचे मनोज कोटक निवडून आले होते. आता तेच इथले विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप या ठिकाणी कोणाला उमेदवारी देते की, शिंदे गट अथवा अजित पवार गटाला जागा सोडते याबाबत उत्सुता आहे.