BJP च्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक, देवेंद्र फडणवीस यांना नेतेपद मिळण्याची शक्यता

तर शिवसेना-भाजपने युती करत निवडणूक लढवली. मात्र आता मुख्यमंत्री पद आणि समान जागावाटपावरुन युतीमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात विधाSनसभा निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनावरुन वाद कायम आहे. तर शिवसेना-भाजपने युती (Shiv Sena-BJP Alliance) करत निवडणूक लढवली. मात्र आता मुख्यमंत्री पद आणि समान जागावाटपावरुन युतीमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच शिवसेनेने भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही शिवसेनेला सत्तेबाबत  कोणतेच आश्वासन दिले नसल्याचे विधान केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरु आहे. तसेच मंगळवारी जागावाटपावरुन भाजपसोबतची बैठक शिवसेनेने रद्द केली. मात्र आज मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदारांच्या नेते पदाची कमान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(नवे मुख्यमंत्री कोण ते आदित्य ठाकरे यांनी काय करावं... पाहा देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख 10 मुद्दे)

AIR Tweet:

यापूर्वी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे झाले आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय असल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर आता सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामधील बोलणे महत्वपूर्ण मानले जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा शिवसेनेकडून सत्ता स्थापनासाठी प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करु असे म्हटले आहे.

विधानसभा निवडणूकीत भाजपला 105 जागा मिळाल्या असून त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला आहे. पण भाजप-शिवसेना युतीने बहुमताचा आकडा पार केला. युतीमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरुन नवा वाद सुरु झाला आहे. तसेच शिवसेनेने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी भाजपकडे केली आहे. मात्र भाजपने शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारला आहे.