Amey Ghole Tests Positive For COVID19: मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांना कोरोनाची लागण

मुंबईत (Mumbai) आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र झटत आहेत. परिणामी, मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे.

Amey Ghole (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत (Mumbai) आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र झटत आहेत. परिणामी, मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे कौतूकही केले होते. मात्र, कोरोनाविरुद्ध लढाईत पहिल्यापासून महत्वाची भूमिका बजावणारे मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे मुंबई महानगर पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सावधानीचा इशारा देण्यात आला आहे.

अमेय घोले यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने अमेय घोले यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे व्हा, अशा सदिच्छाही दिल्या आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन घोले यांनी केले आहे. सर्वांचे आशीर्वाद, सदिच्छा आणि प्रेमाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होईन, असा विश्वासही घोले यांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- COVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर सुरुच; राज्यात दिवसभरात 8 हजार 369 रुग्णांची नोंद, 246 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. दर दिवस मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ पाहायला मिळत होती. मात्र, मुंबई महापालिकेच्या अथक परिश्रमातून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. मुंबईत आज 995 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत दिवसभरात 905 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत एकूण 73 हजार 555 जणांनी कोरोनावर मात केली आहे.