मुंबईकरांसाठी डबल अपडेट! मेट्रो सकाळी लेट, रात्री उशिरापर्यंत धावणार; संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लाइन २ए, लाइन ७ आणि लाइन ९ वरील सकाळची सेवा सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गाड्या धावणार असल्याचा दिलासाही देण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी डबल अपडेट! मेट्रो सकाळी लेट, रात्री उशिरापर्यंत धावणार;  संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा
i Metro | (Photo Credit - X)

मुंबई मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने घोषणा केली आहे की, 15 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत मेट्रो फेज वनच्या लाइन 2A लाइन 7 आणि लाइन 9 वरील गाड्यांची सेवा सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. दहिसर, अंधेरी, बोरिवली, कांदिवली आणि मीरा-भाईंदर मार्गावरून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

सर्वसाधारण दिवशी या सेवा सकाळी लवकर सुरू होतात, मात्र तांत्रिक कामे आणि सुरक्षा चाचण्यांमुळे 10 दिवसांसाठी सकाळच्या वेळेत 30 मिनिटांची कपात करण्यात आली आहे.

10 दिवसांच्या मॉर्निंग ब्लॉकचा निर्णय का घेण्यात आला

मेट्रो लाइन 9 चा दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर हा दुसरा टप्पा आता कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नवीन मेट्रो मार्गिका सध्याच्या लाइन 2ए आणि लाइन 7 च्या जाळ्याशी सुरक्षितपणे जोडण्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेचा ताळमेळ बसवणे आवश्यक आहे. या दरम्यान चारकोप डेपोच्या ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरमधून नवीन सिग्नलिंग सॉफ्टवेअरची चाचणी घेतली जाणार असून, गाड्यांचा वेग आणि स्वयंचलित ब्रेकिंग तंत्रज्ञानाचीही तपासणी केली जाणार आहे. दिवसाच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी तांत्रिक चमूंना काम करण्यासाठी पहाटेची वेळ देण्यात आली आहे.

रात्री 12.30 वाजेपर्यंत धावणार गाड्या

सकाळच्या वेळेत 30 मिनिटांचा विलंब होणार असला, तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविक आणि रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोने एक दिलासादायक बातमीही दिली आहे. 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत लाइन 2A, 7, 9 आणि 2B वरील शेवटची गाडी रात्री 11 वाजण्याऐवजी रात्री 12.30 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

याशिवाय, सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दररोज १० ते १५ अतिरिक्त फेऱ्याही चालवल्या जात आहेत.

प्रवाशांनी काय लक्षात ठेवावे

तांत्रिक कामांमुळे होणारा हा बदल तात्पुरता असून, केवळ 15 ते 25 सप्टेंबर या कालावधीपुरताच मर्यादित आहे. सकाळी लवकर प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाने वेळापत्रकातील हा बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे, रात्री उशिरापर्यंत वाढवण्यात आलेल्या सेवेचा फायदा गणेशोत्सवातील मिरवणुका आणि विसर्जन सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2026 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).