Mumbai Metro: मुंबईला तब्बल 9 वर्षांनंतर मिळणार दोन नवीन मेट्रो लाईन्स; जाणून घ्या कधी होणार सुरु होणार सेवा
सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही मार्गांचे काम पूर्णपणे सुरू होईल. दरम्यान, 2A मेट्रो लाईनच्या बांधकामाचा खर्च 6,410 कोटी आहे तर 7 च्या बांधकामासाठी 6,208 कोटी रुपये खर्च आला आहे.
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिका 2A (दहिसर पश्चिम ते अंधेरी पश्चिम डीएन नगर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) जानेवारी 2023 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ही माहिती दिली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील धनुकरवाडी (कामरान नगर) ती आरे कॉलनी अशा 20 किमी अंतराच्या या मार्गांच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला होता.
सध्या या दोन्ही मार्गिका अर्धवट सुरू आहेत. मुंबईतील मेट्रो रेल्वेचे संचालन आणि देखभाल करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने सांगितले की, सध्या या दोन्ही मार्गांवर 18 स्थानकांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहे आणि दररोज सरासरी 30,000 लोक या सेवेचा लाभ घेत आहेत. कदाचित जानेवारीमध्ये 30 स्थानके आणि 35 किलोमीटरची ही सेवा पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, दररोज 3 लाख प्रवाशांची उपस्थिती नोंदवणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
MMMOCL ने सांगितले की 2031 पर्यंत, दिवसाला 11.37 लाख प्रवाशांनी या दोन मार्गांवर प्रवास करणे अपेक्षित आहे. MMMOCL अधिकार्यांनी सांगितले की, या दोन्ही मार्गिका घाटकोपर आणि वर्सोवा दरम्यान डीएन नगर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) स्थानकांदरम्यान धावणाऱ्या विद्यमान मेट्रो वनला देखील जोडल्या जातील. (हेही वाचा: Nashik: मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन; तब्बल 1800 कोटी रुपये होणार खर्च)
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन नवीन मेट्रो मार्ग मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना समांतर धावतील. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस जड वाहतूक दिसते. याशिवाय या दोन मार्गिका सुरू झाल्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दीही कमी होण्याची अपेक्षा आहे, कारण मेट्रोचा प्रवास लोकल गाड्यांपेक्षा खूपच आरामदायी होणार आहे.
कमिशन फॉर मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) ने मुंबई मेट्रो लाईन्स 2A आणि 7 चे निरीक्षण सुरू केले आहे. सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही मार्गांचे काम पूर्णपणे सुरू होईल. दरम्यान, 2A मेट्रो लाईनच्या बांधकामाचा खर्च 6,410 कोटी आहे तर 7 च्या बांधकामासाठी 6,208 कोटी रुपये खर्च आला आहे. प्रत्येक ट्रेनला 6 डबे आहेत, प्रत्येक डब्यात 380 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. मुंबईची पहिली मेट्रो लाईन मुंबई मेट्रो वनचे ऑपरेशन 2014 मध्ये सुरू झाले, ही मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावते.