Mumbai Metro-3 First Phase: मुंबई मेट्रो-3 च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार- CM Eknath Shinde
याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे.
मुंबई (Mumbai) शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या (Mumbai Metro) माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-3 हा मार्ग जवळपास 90 टक्के पूर्ण झाला असून, येत्या डिसेंबर 2023 अखेर पर्यंत मेट्रो 3 चा हा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनद्वारे तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो-3 च्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी स्थानकाची पाहणी केली.
मुंबई मेट्रो मार्ग-3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो 3 मार्ग हा मेट्रो-1, 2, 6 आणि 9 यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) डिसेंबर 2023 अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून 2024 पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा 33.5 कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर 27 स्थानके असून त्यापैकी 26 भुयारी तर एक जमिनीवर आहे. (हेही वाचा: Aditya Thackeray Visit BDD Chawl: आदित्य ठाकरे यांची वरळी येथील बीडीडी चाळीला भेट, पुनर्विकासाच्या कामाची पाहणी)
पहिला टप्पा- आरे ते बीकेसी या मार्गावर 10 स्थानके असून त्यापैकी 9 भुयारी तर एक जमिनीवर आहे. हे अंतर 12.44 किमी आहे. सेवेची चाचणी ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.
दुसरा टप्पा- बीकेसी ते कफ परेड या मार्गावर 17 स्थानके आहेत. हा मार्ग अंदाजे जून 2024 मध्ये सुरू होणार आहे.