Mumbai Schools Reopen: मुंबईत शाळा पुन्हा उघडण्याची तयारी सुरू, काय असतील नियम? घ्या जाणून
याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा (Schools) सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट झाल्याची पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा (Schools) सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, सोमवारपासून राज्यातील इयत्ता आठवी आणि बारावीपर्यंतचा अभ्यास सुरु होणार आहे, हे लक्षात घेता शाळांना सॅनिटाईझ केले जात आहे. महत्वाचे म्हणजे, कोणत्याही विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. तर, एका वर्गात केवळ 20-25 विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे. याशिवाय, मुले शाळेत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात, असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हटले आहे.
शालेय विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या संमती पत्राशिवाय वर्गांना उपस्थित राहू शकणार नाहीत. यासोबतच फेस मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. दुसरीकडे, महापौर किशोरी पेडणेकर आज झूमच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्टपणे सांगितले आहे की इतर लहान वर्ग सुरू करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला जाईल. हे देखील वाचा- School Reopen: येत्या 4 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या 8-12 वी च्या वर्गासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडून संमतीपत्र घेऊन घ्यावे- महापौर किशोरी पेडणेकर
ट्वीट-
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ञांच्या मते, कोविड -19 रोखण्यासाठी बहुस्तरीय उपायांचा अवलंब करून प्राथमिक वर्गांपासून टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा उघडल्या पाहिजेत. 'द इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, तज्ञांनी युनेस्कोच्या अहवालाचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे, की 500 पेक्षा जास्त दिवसांपासून शाळा बंद केल्यामुळे भारतात 320 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी प्रभावित झाले आहेत.