मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक; शिवसेनेची सत्ता कायम राहणार
सुहास वाडकर (Adv. Suhas Wadkar) हे उपमहापौर पदाचे दावेदार आहेत.
विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election), सत्तासंघर्ष आणि राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule) या सगळ्याच्या नंतर आज मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा निवडणूक सत्र पार पडणार आहे. मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) व उपमहापौर (Mumbai Deputy Mayor) पदासाठी ही निवडणूक असून यामधून अगोदरच भाजप (BJP) , काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) माघार घेतली आहे. यामुळे निश्चितच महापौर पदावर शिवसेनेचे उमेदवार कायम राहून सेनेची सत्ता यंदाही अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट आहे. आज, शुक्रवारी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असून सेनेच्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या महापौर पदासाठी तर अॅड. सुहास वाडकर (Adv. Suhas Wadkar) हे उपमहापौर पदाचे दावेदार आहेत.
या निवडणुकीसाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल परब, माजी मंत्री रामदास कदमव अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
वास्तविक, विधानसभा निवडणुकीत सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून महायुती म्हणजेच शिवसेना व भाजपामध्ये फूट पडली आहे. अशावेळी मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपला संधी होती. मात्र यासाठी फोडाफोडची राजकारण करून त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या बाजूला करावे लागले असते. "मात्र आम्ही सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाणार नाही तर पुढील वेळेस स्वस्तच्या संपूर्ण संख्याबळावर सत्तेवर दावा करू", अशी भूमिका भाजपने घेतली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी माहिती देत भाजपाने महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे कळवले.
दुसरीकडे, शिवसेना आता काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती करून सत्तास्थापनेच्या विचाराधीन आहे. या महाविकासाआघाडीचा मान ठेवत दोन्ही पक्षांकडून सेनेला महापौर निवडणूक बिनविरोध जिंकू देण्याचा पवित्रा स्वीकारण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपच्या सर्व नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले असून, पूर्व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार तयारी केली आहे. निवडणूक पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार आहेत.