Mumbai Marathi Signboard Rule: मराठी नावांबाबत BMC कडून जवळपास 95,000 दुकानांची तपासणी; 3,388 आस्थापनांनी केले उल्लंघन, वसूल केला 1.35 कोटी दंड

बोर्डवर मराठी भाषेच्या फॉन्टचा आकार इतर भाषांइतकाच असला पाहिजे, असेही नियमात नमूद आहे.

BMC (File Image)

Mumbai Marathi Signboard Rule: मुंबईमध्ये (Mumbai) दुकाने, आस्थापना यांच्या बोर्ड्सवर मराठीमध्ये नाव (Marathi Sign Board) असणे सक्तीचे आह्रे. गेल्या काही महिन्यांपासून या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र शहरात अजूनही अशी अनेक दुकाने आहेत, ज्यांच्यावर मराठी नावे दिसत नाहीत. याबाबत बीएमसीने नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत शहरातील 24 वॉर्डांमधील 94,903 दुकाने आणि आस्थापनांची तपासणी केली आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) कायद्याचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल, यातील 3,388 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. याद्वारे नियमभंग करणाऱ्यांकडून एकूण 1.35 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

जानेवारी 2022 मध्ये, सरकारने अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांनादेखील मराठीत नावाचा फलक दाखविणे बंधनकारक केले. बोर्डवर मराठी भाषेच्या फॉन्टचा आकार इतर भाषांइतकाच असला पाहिजे, असेही नियमात नमूद आहे.

देवनागरी लिपीत मराठी संकेतफलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दुकानांना दिलेली मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपली. त्यानंतर परवाना विभागातील सुमारे 48 अधिकाऱ्यांची, प्रत्येक प्रभागात दोन अशा प्रकारे नियुक्ती केली व दुकाने आणि आस्थापनांची तपासणी केली. त्यानंतर उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. नागरी परवाना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘संपूर्ण शहरात सुमारे पाच लाख दुकाने आणि आस्थापना आहेत. जुलै अखेरपर्यंत, अंदाजे 94,903 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे व त्यापैकी 3,388 आस्थापनांनी नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले. नियमाचे उल्लंघन नकारात एखादे दुकान सुरू ठेवल्यास, दिवसाला 2,000 रुपये अशा प्रकारे दंड आकारला जातो.’ (हेही वाचा; 'Driverless Car' in Pune: गाडीत चालक नसताना पुणे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्स टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ)

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांकडून आतापर्यंत 1.35 कोटी रुपये दंड गोळा केला आहे. शहरात डी वॉर्ड (मलबार हिल, ग्रँट रोड), एस वॉर्ड (विक्रोळी, भांडुप), जी साउथ वॉर्ड (वरळी, प्रभादेवी), एच वेस्ट वॉर्ड (वांद्रे, खार), जी नॉर्थ वॉर्ड (दादर, सायन), आणि ई वॉर्ड (भायखळा) मध्ये मानकांनुसार मराठी सूचनाफलकांचा अभाव आढळून आला.