मुंबई : किंग्स सर्कल परिसरात भरधाव गाडीच्या धडकेत FOB चा 'हाईट बॅरिअर' निखळला; दिवसभर वाहतूक कोंडी
प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील किंग्स सर्कल येथे असलेल्या भरधाव गाडीच्या धडकेत FOB चा 'हाईट बॅरिअर' कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या वेळेस घडली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे. किंग्ज सर्कल स्टेशनबाहेरील रस्त्यावरच्या पादचारी पुलाखाली ( FOB )कंटेनरसारख्या अवजड वाहनांना अटकाव घालण्यासाठी 'हाइट बॅरिअर' लावण्यात आला आहे. भरधाव गाडीच्या धडकेमुळे हा बॅरिअर निखळला. त्यानंतर दिवसभर मुंबईकरांना दादरच्या दिशेने जाताना वाहतुकोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान याच पूलावरून हार्बर रेल्वेलाईनची देखील वाहतूक होते. मात्र सुदैवाने या अपघाताचा रेल्वे सेवेवर परिणाम झालेला नाही.
घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या प्रकाराचा राग व्यक्त करण्यासाठी त्वरित सोशल मीडियावर या घटनेचे फोटो शेअर केले. ज्यामध्ये एक लोखंडी ब्लॉक रस्त्यावर पडलेला दिसत आहे. या घटनेबाबत वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस सतर्क झाले. लोखंडी पुलाचा निखळलेला भाग बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून क्रेनच्या सहाय्याने तो हटवण्यात आला. मात्र तासाभराच्या नंतर या मार्गातील वाहतूक कोंडी दूर झाली.(मुंबई: मध्य रेल्वेकडून आज रात्री 12 ते 4 दरम्यान घेतला जाणार नाईट ब्लॉक; लोकल सह 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत)
यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कामाच्या वेळेस हा प्रकार घडल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीवर परिणाम झाला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणारा सायन उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचा राग ही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर सायन उड्डाणपुलाचे काम येत्या एप्रिल पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.