Kandivali Shocker: धक्कादायक! कांदिवली येथील भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूची संख्या वाढली; घातपाताची शक्यता; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Street Dogs | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरातील उपनगर असलेल्या कांदिवली (Kandivali) पश्चिम येथे भटक्या कुत्र्यांचे (Stray ) 14 मृतदेह धक्कादायक स्थितीत आढळून आले आहेत. यातील काही मृतदेह तर छिन्नविच्छीन (Animal Cruelty) अवस्थेत असून ते प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरुन नाल्यात फेकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कुत्र्यांची हत्या झाली असावी हे तर स्पष्ट आहे. मात्र, ती कोणत्या कारणास्तव करण्यात आली असावी. यामागे आणखी काही व्याप्त कारण आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. सुरुवातीस केवळ 5 कुत्र्यांचेच मृतदेह आढळून आले होते. मात्र, आता त्यात वाढ झाल्याने हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत (Prevention of Animal Cruelty Act) गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर कुत्र्यांच्या मांसाचा काही चुकीच्या कारणांसाठी तर वापर केला जात नसावा ना? अशी शंकाही स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

श्वानप्रेमीच्या संशयामुळे घटना उघडकीस

साईनगर परिसरातील रहिवासी आणि प्रसिद्ध प्राणीप्रेमी/ श्वानप्रेमी रोहित कुमार आणि राकेश मुक्का हे स्थानिक कुत्र्यांना नियमीतपणे आहार देतात. दरम्यान, आहार घेण्यासाठी नियमीतपणे येणारे आणि दिसणारे कुत्रे अचानक बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या श्वानप्रेमी कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी परिसरात बेपत्ता कुत्र्यांचा शोध घेतला असता, त्यांना नाल्याजवळ कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले. धक्कादायक म्हणजे यातील काही कुत्र्यांचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळले. त्यातील काही श्वानांच्या मानेवर आणि पायांवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. या सर्व प्रकार पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी तातडीने प्योर ॲनिमल लव्हर (PAL Animal Foundation) या ना नफा ना तोटा या बिगरशाससीक सेवाभावी पशू कल्याण संस्थेशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच संस्थेने कांदिवली पोसीस स्टेशनशी तातडीने संपर्क साधला. (हेही वाचा, Kandivali Shocker: कांदिवली भागामध्ये तोंडाच्या मुसक्या आवळलेल्या अवस्थेमध्ये गटारात सापडले 5 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह; गुन्हा दाखल)

नागरिक परिसरातील नाल्यात कुत्र्यांचे मृतदेह

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 325 आणि पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साईनगर येथील मंगलमयी इमारतीतील रहिवासी हीना लिंबाचिया यांना प्रथम काही कुत्रे त्यांच्या सोसायटीतील फाटकाजवळ असलेल्या नाल्यात मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. त्यांनी तातडीने हा प्रकार आषिश बुसा यांच्या निदर्शनास आणून दिला. बुसा यांनी तातडीने पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने मृतदेह काढून दफन करण्यात आले. (हेही वाचा, 23 Dog Breed Ban in India: भारतात मोदी सरकार धोकादायक 23 जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालणार! पाहा, कुत्र्यांची संपूर्ण यादी)

मृत्यू, हत्या की, घातपात?

प्राप्त माहितीनुसार, मृतावस्थेत आढळळेले सर्व भटके कुत्रे होते. ज्यांची काळची स्थानिक रहिवासी घेत असत. मृतावस्थेत असलेले बहुतांश कुत्रे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळले. सुरुवातीला हे कुत्रे स्वत:हून पाण्यात गेले असावेत आणि बुडालेत असावे असा संशय होता. मात्र, नंतर एकाच वेळी अनेक कुत्रे मृतावस्थेत आढळले. इतकेच नव्हे तर त्यातील काही तर प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये आढळळ्याने हा घातपात असावा अशी शंका निर्माण झाली.

कांदिवली पोलीस सध्या परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेजचा आढावा घेत आहेत. ज्याद्वारे कुत्र्यांच्या मारेकऱ्याचा शोध घेता येईल. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे उपाध्यक्ष आणि पी. ए. एल. एनिमल फाऊंडेशनचे कायदेशीर सल्लागार रोशन पाठक यांनी खुलासा केला की, सोमवारी आणखी दोन कुत्र्यांचे मृतदेह सापडले. "आमचा अंदाज आहे की सुमारे 13-14 कुत्रे मारले गेले आणि नाल्यात फेकले गेले असावेत. काही वाहून गेल्याची शक्यता आहे", पाठक म्हणाले.