Mumbai Heatwave Alert: सागरी किनारपट्टीसह, मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक ठिकाणी उष्णतेची लाट शक्य, हवामान खात्याचा इशारा
या हंगामात मुंबई शहरात प्रथमच कमाल तापमान 36.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढचे काही तास उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Mumbai Heatwave Alert: मुंबई शहरामध्ये तापमान (Mumbai Temperature) वाढले असून उन्हाळा काहीसा अधिकच कडक जाणवू लागला आहे. या हंगामात मुंबई शहरात प्रथमच कमाल तापमान 36.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढचे काही तास उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे, केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईसोबत, सागरी किनारपट्टी, ठाणे, नाशिक जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता किमान पुढचे 48 तास टीकून राहू शकते.
मुंबईमध्ये तापमान वाढले असून पुढचे काही तास ते चढेच राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मुंबईत हवामान कोरडे, दमट आणि अधिक उष्ण राहू शकते. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन करतानाच भारतीय हवामान खात्याने (IMD) शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, आगामी काळात उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला आहे. (हेही वाचा, Heat Stroke: उन्हाळा वाढला आहे, म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपाय आणि सुरक्षा)
उष्णतेच्या लाटेबद्दल दिल्या जाणाऱ्या यलो अलर्टबद्दल सांगायचे तर, जेव्हा कमाल तापमान दोन दिवस 37°C च्या पुढे जाते किंवा जेव्हा सामान्य तापमान 4.5°C आणि 6.4°C दरम्यान असते तेव्हा IMD किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करते. मैदानी भागासाठी, जेव्हा स्थानिक तापमान 40 डिग्री सेल्सिअस ओलांडते आणि त्याच वेळी प्रादेशिक तापमान सामान्यपेक्षा 5°C ते 6°C वाढते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागांमद्ये मागच्या दोन दिवसांमध्ये दिवसाचे तापमान 40-42 अंश सेल्सिअसमध्ये नोंदवले गेले. हे तापमान संपूर्ण राज्यात पारा 2-3°C ने वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे IMD ने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. राज्यातील वाढते तापमान विचारात घेता आयएमडीने कोकण आणि मध्य महाराष्ट्र उपविभागांवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जेणेकरून स्थानिकांना उष्ण हवामानाबद्दल ‘अपडेट’ राहण्याचे आवाहन केले जाईल. कोकण विभागाव्यतिरिक्त मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव येथेही जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.