मुंबईत 'स्वाईन फ्लू' चा पहिला बळी, केईएम रुग्णालयात तरुणीचा मृत्यू

पावसाळ्याच्या काळात विषाणूंचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा साला वैद्यकीय जाणकारांकडून देण्यात येत आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई: पावसाळा सुरु होताच स्वाईन फ्लू (Swine Flu) या भयंकर आजाराने पुन्हा डोके वर काढायला सुरवात केली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital)  शनिवारी स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू झाला. गोवंडी (Govandi) येथे राहणाऱ्या 26 वर्षीय दानिश्ता खान (Danshita Khan) हिला 8 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टोचीही (Lepto) लागण झाली होती. तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचाराच्या दरम्यान 13 जुलै रोजी रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

(हे ही वाचा- स्वाईन फ्लू रोखण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या! )

माध्यमांच्या अहवालानुसार, 1 जानेवारी 2019 ते 10 एप्रिल 2019 या काळात राज्यात 1  हजार 236 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळले होते. त्यातील 45 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यास डॉक्टरांना यश आले. याशिवाय ऑसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण 22 हजार 376 एवढे आहेत.तूर्तास, राज्यातील स्वाईन फ्लूने बाधित रुग्णांची संख्या 1  हजार 745 असून, सध्या 86 जण रुग्णालयात भरती आहेत. राज्यात जानेवारीपासून 191 जणांचा, तर मुंबईत चार जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.