Mumbai Commissioner: मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त आवश्यक; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

आत मुंबई उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश मोठ्या असतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन आयुक्तांची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शेख यांनी म्हटले आहे.

Aslam Shaikh On BMC Commissioner | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहरासाठी एक नव्हे तर दोन आयुक्त असायला पाहिजेत अशी मागणी काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) क्षेत्र त्याचा नागरिकरणामुळे होणारा विस्तार आणि एकूण लोकसंख्या या सर्व गोष्टींचा विचार करता या शहरासाठी एक आयुक्त पूरेसा ठरु शकत नाही. त्यामुळे या शहराला (BMC) दोन आयुक्तांची आवश्यकता, आहे अशी भूमिका अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.

अस्लम शेख यांनी म्हटले आहे की, मुंबई हे राजधानीचे शहर आहे. राज्याची रजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच, या शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणूनही ओळख आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील कानाकोपऱ्यातून लोक मुंबई शहरामध्ये रोजीरोटी कमावण्यासाठी येत असतात. या सर्वांमुळे मुंबईचे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. प्रचंड प्रमाणावर लोकसंख्या वाढते आहे. त्याचा शहरांवर आणि व्यवस्थांवर मोठा ताण निर्माण होत आहे. अशा महाकाय शहराला सेवा-सुविधा पुरवणे ही जबाबदारी महानगरपालिकाची असते. अशा वेळी एकच पालिका आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रलंबीत राहतात. परिणामी नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे मुंबई शहरासाठी दोन आयुक्तांची आवश्यता असल्याचे शेख म्हणाले. (हेही वाचा, Mumbai COVID-19 Death Cases: मुंबईत कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी मृत्यूदर पाहून BMC आयुक्तांनी कोविड योद्धांसह जनतेचे केले अभिनंदन)

शहरातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस कार्यालयात यावे लागते. आत मुंबई उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश मोठ्या असतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन आयुक्तांची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शेख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पी-उत्तर वॉर्ड विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्त असायला हवेत अशी मागणी होताना दिसत आहे. या पालिकेसाठी दोन आयुक्त असल्यास नागरिकांच्या प्रश्नाची तड लवकरा लवकर लागणे सोयीचे होईल, असे अनेकांना वाटते. आजघडीला मुंबई शहर आणि उपनगर असे दोन जिल्हाधिकारी आहेत. त्याच प्रमाणे ही दोन पदे निर्माण करण्यात यावीत असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.