मुंबई: घाटकोपर-अंधेरी मार्गाने जोडणारा पूल अतिधोकादायक असल्याने बंद, वाहतूक वळवली
तर आज (1 जून) मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्वीट केले असून हा पूल अतिशय धोकादायक असल्याचे सांगत बंद केल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील (Mumbai) घाटकोपर-अंधेरी (Ghatkopar-Andheri) मार्गावरील पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल शुक्रवारी (31 मे) दुपारपासून पुर्वसुचनेशिवाय बंद करण्यात आला होता. तर आज (1 जून) मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्वीट केले असून हा पूल अतिशय धोकादायक असल्याचे सांगत बंद केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.
लक्ष्मीबाग नाल्याजवळील घाटकोपर-अंधेरी येथील जोडरस्त्यावरील पूल धोकादायक असल्याने महापालिकेकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सदर मार्गावरील जड वहाने वळण्यात आली आहे. तर एस.बी. एस. रोड उत्तर वाहिनी वरुन जाणारी जड वहाने संघाने जंक्शन येथील उजव्या वळणाने न जाता सरळ गांधी नगर जंक्शन येथून वळण घेऊन पूर्व द्रुतगती मार्गाने वळवण्यात आली आहे.
तर दक्षिण वाहिनी येथून जाणारी वाहने ही संघानी जंक्शन येथून डावे वळण न घेता सरळ कुर्ल्याच्या दिशेने कुर्ला वाहतुक चौकी येथील डाव्या वळणावरील एस. सी. एल. आर. येथून पुर्व द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली आहे.(मुंबई: घाटकोपर मधील पूर्व-पश्चिम जोडणारा पूल पूर्वसुचनेशिवाय बंद, नागरिक सहन करतायत वाहतूक कोंडीचा त्रास)
दरम्यान, काल अचानक महापालिकेकडून दुपार पासून घाटकोपर पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल बंद केल्याने संध्याकाळ पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांकडून याबद्दल संताप व्यक्त केला जात होता.