Mumbai: घर देण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
अशाप्रकारे विविध प्रकरणात लोकांची एकूण 1.2 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) घर देण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. काळाचौकी पोलिसांनी, 2020 मध्ये म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने 1.2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींपैकी एकावर यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तो आर्थर रोड कारागृहात आहे. या प्रकरणातील तक्रारदार 33 वर्षीय दिप्ती चव्हाण या शिवडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर, संशयितांकडून इतरांचीही अशीच फसवणूक झाल्याचे पोलिसांना आढळून आले.
माहितीनुसार, चव्हाण यांनी आपले घर विकून त्याच परिसरात मोठे घर घेण्याचा बेत आखला होता. या प्रकरणातील आरोपी रिअल इस्टेट एजंट जगदीश पालांडे याने त्यांना रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाच्या बदल्यात सरकारकडून भरपाई म्हणून मिळालेली घरे विकू इच्छिणाऱ्या पार्टीच्या ऑफरचे आमिष दाखवले. त्या संदर्भात पलांडे याने चव्हाण यांची प्रशांत मेस्त्री, मनाली मिस्त्री आणि सुनील पवार यांच्याशी ओळख करून दिली.
त्यांनी चव्हाण यांना नुकसानभरपाईची घरे विकण्यास इच्छुक असलेल्या लोकांच्या अनेक फाईल्स दाखविल्या व या संदर्भात माहीम येथील रहिवासी असलेल्या नामदेव राणे यांच्याची त्यांची ओळख करून दिली. राणे यांना परळ येथील खापरीदेव को-ऑप सोसायटीत घर मिळणार होते. या घराची 80 लाख किंमत सांगितली गेली आणि चव्हाणांना चेकद्वारे 40 लाख आगाऊ भरण्यास सांगण्यात आले. परळ येथील घर अजून मिळाले नव्हते त्यामुळे राणेंच्या माहीमच्या घराचे हक्क चव्हाण यांना देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
म्हाडाकडे या घराचे हमीपत्र सादर करून घर हस्तांतरित करून परळ येथे मिळेल असे सांगण्यात आले. नंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी चव्हाण यांच्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, घर मिळण्यास उशीर झाल्याबद्दल चौकशी केली असता, संशयितांनी चव्हाण यांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आणि डड चेक दिला. परंतु त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. (हेही वाचा: Bhiwandi Building Collaps: भिवंडी इमारत दुर्घटने प्रकरणी मृतांचा आकडा 5 वर, बचाव कार्य अद्याप सुरु)
याबाबत गुन्हा नोंदवण्यासाठी काळाचौकी पोलिसांकडे गेले असता, त्यांना तिथे समजले की, आणखी एक खरेदीदार स्नेहा वाळुंज यांचीही अशाच व्यवहाराच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक झाली आहे. अशाप्रकारे विविध प्रकरणात लोकांची एकूण 1.2 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आता संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.