सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना अटक
सहायक अभियंता एस.एफ. काकुळते या पालिका सहाय्यकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)जवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला होता तर, 31 लोक जखमी झाले होते. याप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले होते. आता याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. सहायक अभियंता एस.एफ. काकुळते या पालिका सहाय्यकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार स्ट्रक्चरल ऑडीटनंतर काकुळते विरूद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उद्या या आरोपीला न्यायालयात हजार केले जाईल. (हेही वाचा: सायन उड्डाणपूल 20 एप्रिलपासून पुढील दोन महिने वाहतुकीसाठी बंद)
आता मुंबईतील सर्व अतिधोकादायक पूल पाडण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. माटुंगा स्थानक येथील पादचारी पुलाला तडे गेल्याचे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने महापालिकेला पत्र पाठवले होते, परंतु हा पूल सुरक्षित असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान वानखेडे स्टेडियमकडे जाणारा श्री पाटण जैन मंडळ राेडवरील पादचारी पूल पालिकेने बंद केला आहे. हा पूल अतिधोकादायक असल्याने बंद केला गेला आहे.