मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर केले जाणार, वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा निर्णय
यामध्ये मुंबईसह उपनगरातील 244 पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे.
Coronavirus In Mumbai: मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा झपाट्याने आकडा वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तर टास्क फोर्सकडून बेक्र द चेन आधारावर राज्यात 8-14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी केली जात आहे. त्याचसोबत मुखमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊन संदर्भात बैठका घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने (BMC) वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता शहरातील पंचतारांकित हॉटेल्सचे (Five Star Hotels) क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईसह उपनगरातील 244 पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे.(Maharashtra Lockdown: टास्क फोर्सकडून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी, कॅबिनेटकडून 14 एप्रिल पर्यंत निर्णय जाहीर करण्याची शक्यता)
क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील लिस्टमध्ये 29 पंचतारांकित हॉटेल्स, 34 चार स्टार हॉटेल्स, 56 तीन स्टार हॉटेल्स आणि 38 दोन स्टार हॉटेल्ससह 86 बजेट हॉटेल्स आणि एक विमानतळावरील हॉटेलचा समावेश यामध्ये आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्याचसोबत ज्या रुग्णांना घरी रहावेसे वाटत नाही ते सुद्धा या हॉटेल्समध्ये येऊन राहू शकतात. त्यामुळे घरातील अन्य जणांना सुद्धा त्याच्या संसर्गापासून दूर राहता येईल. तर मुंबईतील क्वारंटाइन सेंटरसाठी कोणती पंचतारांकित हॉटेल्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला येथे पाहता येणार आहे.
हॉटेल्सची किंमत ही येणारे प्रवासी आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या आधारावर ठरवली जाणार असल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यानुसार प्रत्येक दिवसाचे भाडे कमीतकमी 3500-4500 रुपये हे पंचतारांकित हॉटेल्ससाठी असणार आहे. तर 2500-4000 रुपये हे चार स्टार हॉटेल्स, 1800-3700 रुपये तीन स्टार हॉटेल्स, 1700 ते 3200 दोन स्टार हॉटेल्स आणि 1200 ते 3000 रुपये हे बजेट हॉटेल्ससाठी असणार आहे.