Coronavirus: मुंबई मध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी; 64 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार घेत असणाऱ्या एका 64 वर्षीय कोरोना ग्रस्त रुग्णाचा काही वेळेपूर्वीच मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मागील 24 तासात 600 हुन अधिक मृत्यू झाले असताना आता मुंबईत कोरोनाचा पहिली बळी गेल्याचे समोर येत आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार घेत असणाऱ्या एका 64 वर्षीय कोरोना ग्रस्त रुग्णाचा काही वेळेपूर्वीच मृत्यू झाला आहे. ही व्यकी घाटकोपर (Ghatkopar) येथे वास्तव्यास होती. कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. कस्तुरबा रुग्णालायत कोरोनाचे तब्ब्ल 9 रुग्ण उपचार घेत असून त्यातील हा पहिला मृत्यू आहे या सोबतच आता देशातील कोरोनामुळे निधन झालेल्यांची संंख्या तीन झाली आहे. सद्य घडीला कोरोनाचे भारतातील थैमान वाढत असून आतापर्यंत 125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आज पर्यंत महाराष्ट्राचे कोरोनाचे तब्बल 39 रुग्ण आढळले आहेत यापैकी एकाचा आज उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोनावरील चाचणीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत 420 रुग्ण दाखल झाले होते, यापैकी 411 जणांची चाचणी ही निगेटिव्ह झाली होती तर 9 रुग्णांवर उपचार सुरु होते. याठिकाणी चोवीस तास ओपीडी आणि आयपीडी सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. तसेच प्रयोगाशाळाही चोवीस तास सुरु ठेवली आहे. वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत तरी सुद्धा आज एक रुग्ण दगावल्याने निराशेचे आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
ANI ट्विट
दरम्यान, कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुंबई सह पुणे, नागपूर या शहरात सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा- कॉलेज, मंदिरे, पर्यटनस्थळे सर्व काही बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे अधिक रुग्ण हे अधिक वयोगटाच्या किंवा अगदीलहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहेत, त्यामुळे संबधित वयोगटातील नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे.