अग्निशामक दलाकडून 3026 इमारतींना नोटीस; अग्निप्रतिबंध उपाययोजना न केल्यास होणार कायदेशीर कारवाई
अग्निशामक दलाकडून 2015 ते ऑक्टोबर 2018 या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबई येथील 6142 इमारतींची तपासणी करण्यात आली होती
मुंबईमधील वाढत्या आगीच्या घटना ही सरकारसाठी एक मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कमला मिल सारख्या आपत्ती परत ओढवू नये म्हणून यावर काही ठोस पावले उचलत, अग्निप्रतिबंध उपाययोजनांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेल्या तब्बल 3026 इमारतींना अग्निशामक दलाने नोटीस पाठवली आहे. अग्निशामक दलाकडून 2015 ते ऑक्टोबर 2018 या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मुंबई येथील 6142 इमारतींची तपासणी करण्यात आली होती. याचवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात अग्नि सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या 84 इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. अग्निशामक दलाकडून पारित झालेल्या आग प्रतिबंधक उपाययोजना प्रत्येक इमारतीने लागू करणे हे बंधनकारक आहे. मात्र अनेक इमारतींनी हे नियम धाब्यावर बसवले आहेत.
पाठवण्यात आलेल्या नोटिसांनंतरही इमारतींनी त्यावर काही उपाययोजना न केल्यास अशा इमारती ‘धोकादायक इमारती’ म्हणून घोषित करण्यात येतील. अशा इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठादेखील खंडित करण्यात येऊन त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदेशीर कारवाई झालेल्या व्यक्तीला तीन वर्षांसाठी तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. गेल्या तीन वर्षांमध्ये 36 जणांवर अशाप्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ताडदेव परिसरातील 'ए-1 सम्राट अशोक' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील टोलेजंग इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचसोबत नुकतेच मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. पण ही आग जाणूनबुजून लावण्यात आली असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आता या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आरे जंगलाला लागलेली आग जवळपास चार किलोमीटरपर्यंत पसरली होती. या आगीत अनेक दुर्मिळ वनस्पती नष्ट झाल्या आहेत.