Mumbai: अवघ्या 5,000 रुपयांच्या भांडणातून बॉसची हत्या करून कर्मचारी फरार; तब्बल 13 वर्षांनंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

एकदा मालकाने आगाऊ 5000 रुपये देण्याचे नाकारल्याने आरोपी भारद्वाज प्रचंड चिडला. त्याने संतापाच्या भरात राजभरला संपवण्याचा कट रचला.

Arrest (PC -Pixabay)

वसईत (Vasai) आपल्या मालकाची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून सुटलेल्या व्यक्तीला आता तब्बल 13 वर्षांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या व्यक्तीचे वाय 39 वर्षे आहे. सोमवारी मीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2010 रोजी पंढरी शामू राजभर (25) या व्यक्तीचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशिमीराजवळील सासुनावघर परिसरात सापडला होता.

हात बांधलेल्या मृतदेहावर गळा दाबल्याच्या खुणा होत्या. त्यावेळी संजय गामा भारद्वाज या आरोपीविरुद्ध कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी 13 वर्षांहून अधिक काळ फरार होता.

अशात आता न सुटलेल्या प्रकरणांचा पुन्हा तपास करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन सानप यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध युनिटला त्यांच्या गुप्तचर नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलंसद्वारे भारद्वाजबद्दल काही महत्त्वपूर्ण लीड्स मिळाल्या. हा आरोपी उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये वारंवार ठिकाणे बदलत होता. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले व त्याला अंधेरीतील चकाला येथून अटक करण्यात आली. (हेही वाचा: Yavatmal Double Murder: यवतमाळमध्ये दोन युवकांची निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ)

माहितीनुसार, मृतक चालवत असलेल्या फॅब्रिकेशन कंपनीत आरोपी हा हेल्पर म्हणून काम करत होता. एकदा मालकाने आगाऊ 5000 रुपये देण्याचे नाकारल्याने आरोपी भारद्वाज प्रचंड चिडला. त्याने संतापाच्या भरात राजभरला संपवण्याचा कट रचला. आरोपी भारद्वाज हा राजभरला सासुनावघर परिसरातील एका निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह ढिगाऱ्यात फेकून दिला. त्यानंतर तो फरार झाला. अखेर 13 वर्षांनी आता तो पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. भारद्वाजची कोठडीत रवानगी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.