बीड: अनधिकृतपणे शासकीय जमीन खरेदी प्रकरणी हायकोर्टाने सुनावलेल्या निर्णयाच्या विरोधात धनंजय मुंडे यांची सुप्रीम कोर्टात धाव, उद्या होणार सुनावणी
यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या (14 जून) रोजी सुनावणी करणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील शासकीय जमीन अनधिकृतपणे खरेदी केल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाऊन पोहचले आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay Highcourt) या निर्णयावर स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. तर 10 जून रोजी मुंबई हायकोर्टाने बीड जिल्ह्यातील ही जमीन धनंजय मुंडे यांनी अनधिकृतपणे खरेदी केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात यावा असे आदेश दिले होते. यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या (14 जून) रोजी सुनावणी करणार आहे.
धनजंय मुंडे अनधिकृत जमीन खरेदी प्रकरणी अडकले आहेत ती जागा अंबोजागाई तहसीलमधील पूस येथे असलेल्या बेलखंडी देवस्थानमध्ये आहे. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करुन अत्यंत कमी पैशात शासकीय जमीन साखर कारखान्यासाठी खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच जमिन खरेदीच्या मोबदल्यात दिलेला चेक न वटल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच अनधिकृतपणे या जमिनीची खरेदी-विक्री केल्यानंतर त्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने तेथील लोकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. त्यानंतर धनजंय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर भाजप पक्षामधील विधान परिषदेचे सदस्य सुरेश यांनी असे म्हटले आहे की, जमीन खरेदी प्रकरणी सुनावणी होणार असल्याने 17 जून पासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या कामकाजासाठी मुंडे पळ काढताना दिसून येतील.