Chaitra Navratri 2020: चैत्रगौर निमित्त मुंबादेवी मंदिरामध्ये आरती; भाविकांनी देवळा बाहेरूनच उभं राहुन घेतला आरतीमध्ये सहभाग
मंदिरातील पूजेचं खास स्क्रीनवर लाईव स्क्रिनिंग सुरू होतं. सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांसाठी धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात चैत्र नवरात्रीची सुरूवात 25 मार्चपासून सुरू झाली आहे. दरम्यान आज (27 मार्च) चैत्र शुद्ध तृतीये दिवशी घराघरामध्ये चैत्रगौरीच्या पूजेला सुरूवात होते. चैत्र तृतीयेपासून अक्षय्य तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेपर्यत महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. यंदा 14 एप्रिल पर्यंत भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन असल्याने सारी धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. मात्र आज सकाळी या चैत्र नवरात्रीमधील मुंबादेवीच्या आरतीमध्ये नागरिकांनी मंदिराबाहेर उभं राहून सहभाग घेतला. मंदिरातील पूजेचं खास स्क्रीनवर लाईव स्क्रिनिंग सुरू होतं. सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांसाठी धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. केवळ पूजारी मंदिरात देवाची पूजा अर्चना, धार्मिक विधी करू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंग ठेवत देवीची आराधना केली.
भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबईमध्ये सिद्धीविनायक मंदिर, हाजी अली दर्गा ते माहिमचं सेंट मायकल चर्चसह सारी प्रार्थना आणि धार्मिकस्थळं सध्या नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. 25 मार्चपासून सुरू झालेलं लॉकडाऊन 21 दिवसांसाठी म्हणजे 14 एप्रिल पर्यंत असेल. या काळात नागरिकांनी बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चैत्रगौरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात महिला माहेरी जातात. महिन्याभराचा मुक्काम करतात. या काळात हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. महिला एकत्र येऊन आंबेडाळ आणि कैरीच्या पन्ह्याचा आनंद लूटतात.
ANI TWEET
जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. भारतात 694 कोरोनाबाधित असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र, केरळ राज्यात आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. असं सांगत पुढील काही दिवस जिथे आहात तेथेच राहा अशी कळकळीची विनंती सरकार, आरोग्य प्रशासना कडूनकरण्यात येत आहे.