मुंबई: पाटलाग करुन तरुणीचे जबरदस्तीने चुंबन; आरोपीला अटक
पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी वसीम शेख हा विवाहित आहे. तसेच, त्याला एक मुलगा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला खाकी वर्दीचा चांगलाच हिसका दाखवला. वसीम शेख (Wasim Shaikh)असे या तरुणाचे नाव आहे. तो पवई (Powai) इथला राहणारा आहे. वसीम शेख याने एका तरुणीचा पाटलाग करुन तिचे जबरदस्तीने चुंबन (Kissing) घेतले होते. हा प्रकार कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाबाहेर (Kanjurmarg Railway Station) रविवारी घडला होता. त्यानंतर पीडितेने ही घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. आरोपी सातत्याने पीडितेला त्रास देत होता. तो तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असे. आरोपीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, गेले काही दिवस तो सातत्याने तिचा पाटलाग करत असे. हा प्रकार घडला त्या रविवारच्या दिवशीही आरोपी वसीम याने विक्रोळी येथे पीडितेचा पाटलाग केला. पीडित तरुणीने विक्रोळी स्थानकात प्रवेश करताच आरोपी वसीम याने तिचा हात पकडला. त्याने तिला रेल्वेस्थानकाबाहेर खेचत नेले. तेथे त्याने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले. (हेही वाचा, कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)
पीडितेने घडल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी आरोपी वसीम शेख याच्याविरोधात पोलीसात तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेतला आणि आरोपीच्या शोधार्थ एक पथक पाठवले. पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी वसीम शेख हा विवाहित आहे. तसेच, त्याला एक मुलगा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.