Mumbai: मुंबईमध्ये येणार Covid-19 लसीकरणाला वेग; BMC खरेदी करत आहे तब्बल 1 कोटी लसीचे डोस, IS Chahal यांची माहिती

आज बीएमसीने लसीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली सोम-मंगळ-बुध असे तीन दिवस वय 60+ कोविशील्डच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी, कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी व दिव्यांग लाभार्थी राहत्या प्रभागाच्या नजीकच्या केंद्रात थेट जाऊ शकतात

COVID19 vaccination | (Photo Credits: ANI)

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मात्र आता राज्यातील तसेच राजधानी मुंबईमधील (Mumbai) रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. सध्या राज्यात लसीकरणानेही वेग घेतला आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात लस जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आता बीएमसी कोरोना साथीच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी, तब्बल एक कोटी कोविड-19 लस आयात करण्याचा विचार करीत आहे. याबाबत पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, ‘येत्या 60 ते 90 दिवसांत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांचे युद्धपातळीवर लसीकरण करण्यासाठी, कोविड-19 लस पुरेशा प्रमाणात मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे.’ एका ग्लोबल टेंडरद्वारे बीएमसी हे लसीचे डोस विकत घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी परवानगी दिली आहे. पुढच्या 2-3 महिन्यात ही लस लोकांना उपलब्ध करून दिली जाईल व त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाणार आहे. याआधी 10 मे रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेला शहरातील लसीच गरज पूर्ण करण्यासाठी लसांच्या ‘जागतिक खरेदीची शक्यता’ शोधण्याचे निर्देश दिले होते.

‘बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड-19 लस आयात करू शकल्यास, मुंबईचे तीन आठवड्यांत लसीकरण होऊ शकते,’ असेही शिवसेना युवा अध्यक्ष म्हणाले होते. ते पुढे म्हणाले की, ‘याबाबतचा ‘खर्च’ हा मुद्दा नसून राज्य सरकारची प्राथमिकता ही ‘लवकरात लवकर लस खरेदी’ करणे ही आहे. आम्ही जागतिक स्तरावर मुंबईकरांसाठी लस घेण्याची शक्यता पाहात आहोत. जर हे शक्य झाले तर तीन आठवड्यांत मुंबईकरांना लस पुरवण्याचा रोडमॅप आमच्याकडे आहे.’ या लसीबाबत खरेदी ऑर्डर निघाल्यावर उत्पादकाने 3 आठवड्यांत लसीचा पुरवठा करणे गरजेचे आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित, लॉकडाऊन कालावधीही वाढविण्याचे राजेश टोपे यांच्याकडून संकेत)

दरम्यान, आज बीएमसीने लसीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली सोम-मंगळ-बुध असे तीन दिवस वय 60+ कोविशील्डच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी, कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी व दिव्यांग लाभार्थी राहत्या प्रभागाच्या नजीकच्या केंद्रात थेट जाऊ शकतात. तर गुरु-शुक्र-शनि नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. रविवारी लसीकरण बंद असेल.