मुंबई: सजग मुंबईकराच्या चलाखीने टळला मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यान मोठा अपघात; छत्रीच्या मदतीने वाचवले हजारोंचे जीव

काल कांजूरमार्ग ते भांडुप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेले होते यावेळी एका सामान्य व्यक्तीने आपलीकडील छत्रीच्या साहाय्याने रेल्वेचालकाला सूचित करून अपघात टाळला.

Central Railway | (photo courtesy: archived, edited, symbolic images)

रेल्वेरूळाच्या आसपास भाज्यांची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचवल्याची घटना काल मध्य रेल्वे (Central Railway) वर घडली आहे. मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गावर कांजूरमार्ग (Kanjurmarg)- भांडुप (Bhandup) दरम्यान रेल्वे रुळाचा 1.5 फूट इतका भाग गहाळ झाला होता. यामुळे रुळाच्या मधोमध फूट पडली होती. इतक्यात ठाण्याकडे जाणारी एक जलद गाडी रुळावरून जाणार होती, पण गाडी जर का या तुटलेल्या रुळावरून गेली असती तर अपघात होणार हे निश्चित होते, अशावेळी या भाजी उगवणाऱ्या सामान्य माणसाने एक अनोखी शक्कल लढवत आपल्याकडील छत्री उघडून ट्रेनच्या मोटरमॅनला पुढे धोका आहे असा इशारा दिला. छत्री पाहताच मोटरमॅनने ट्रेनचा आपत्कालीन ब्रेक लावला व फूट पडलेल्या ठिकाणच्या अवघ्या दोन सेकेंद आधी गाडी थांबली आणि सुदैवावाने गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.

प्राप्त माहितीनुसार या व्यक्तीचे नाव दर्शन चौहान असे असून तो नेहमीप्रमाणे आपली भाज्यांची लागवड पाहण्याकरिता ट्रकजवळ आला होता. तेव्हाच त्याला ट्रकचा एरवी पेक्षा वेगका आणि विचित्र आवाज ऐकू आला. याची पडताळणी करता त्याला ट्रक मध्ये फूट पडल्याचे आढळून आले. दरम्यान, ठाणे ट्रेनच्या आधी बदलापूरला जाणारी एक जलद लोकलही याच ट्रॅकवरून गेली होती. या लोकलच्या मोटरमॅनला सुद्धा फूट पडलेल्या रुळाच्या भागात लोकलला हिसका बसल्याचे जाणवले. याबाबत त्यांनी नियंत्रण कक्षाला देखील कळवले होते. पण अधिकारी घटनास्थळी पोहचण्याआधीच ही दुसरी ट्रेन आली होती.या प्रकारांनंतर जलद मार्गांची वाहतूक पुढील 1 तासाकरिता धीम्या रुळावर वळवण्यात आली होती.

दरम्यान, दर्शन चौहान यांच्या हुशारी आणि समयसूचकतेमुळे हजारोंचे जीव वाचले. यासाठी ट्रेनचालक, नियंत्रण कक्ष व संबंधित व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती जनसंपर्क मुख्याधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.