Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूर्ण होणार

समुद्राच्या बाजूचे बांधकाम मेपर्यंत चालू राहील हे लक्षात घेता, दक्षिणेकडील बाजूस ग्रीन नेट बसविण्याचा विचार केला जात आहे.

Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

Mumbai Coastal Road Project: अटल सेतूनंतर मुंबईला कोस्टल रोडची भेट मिळणार आहे. मुंबईकरांना प्रवासाचा नवा अनुभव देण्यासाठी कोस्टल रोड जवळपास सज्ज झाला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईमधील वाहतूक रहदारीपासून दिलासा मिळणार आहे. नुकतेच बीएमसी (BMC) ने जाहीर केले आहे की, प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडचा बराचसा भाग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खुला केला जाईल. दक्षिणेकडे जाणारा कॅरेजवे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो, जो मे पर्यंत पूर्ण होणार आहे.

बीएमसीने मरीन ड्राइव्ह ते वरळी या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचा एक भाग 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत खुला करण्याची योजना आखली आहे. मुख्य अभियंता (कोस्टल रोड) एमएम स्वामी म्हणाले की, कोस्टल रोडची रचना अशी आहे की वाहने 100 किमी/ताशी वेगाने धावू शकतात. मात्र, सुरक्षेचा विचार करून वेगमर्यादा ताशी 80 किमी एवढीच ठेवण्यात आली आहे. वरळीहून मरीन ड्राईव्हवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत लोकांना ये-जा करता येणार आहे.

या प्रकल्पाचा खर्च साधारण 13,984 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये 9,384 कोटी रुपये हा बांधकाम खर्च असून,  उर्वरित प्रशासकीय शुल्क, पाणी, मलनिस्सारण, खर्च, पर्यवेक्षण, खारफुटीसाठी दिलेली भरपाई आणि उपयुक्तता शिफ्टिंग यांचा समावेश आहे. संपूर्ण प्रकल्प आधीच 84 टक्के पूर्ण झाला आहे, टनेल बोरिंग ऑपरेशन्सचे काम यशस्वीरित्या 100 टक्के पूर्ण झाले आहे. पुनर्वसनाचे काम 97 टक्के वेगाने सुरू आहे. समुद्र भिंत बांधकाम 84 टक्के प्रगत टप्प्यावर आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, कोस्टल रोडची रचना मुंबईच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 70 टक्के आणि इंधनाच्या वापर 34 टक्के कमी होईल. दिवसभरातील सामान्य रहदारीच्या परिस्थितीत मरीन ड्राइव्ह आणि वरळी दरम्यान प्रवासाचा वेळ अंदाजे सध्याच्या 30-45 मिनिटांवरून 8-12 मिनिटांपर्यंत कमी होईल. (हेही वाचा: Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Accident: समृद्धी एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठा अपघात; मरावतीमधील तळेगाव-दशासरजवळ टूरिस्ट बस ट्रकला धडकल्याने तिघांचा मृत्यू, 15 जखमी)

प्रकल्पाचे मुख्य अभियंता मानतय्या स्वामी म्हणाले की, दक्षिणेकडे जाणारा कॅरेजवे त्वरीत उघडण्यावर त्यांचे लक्ष आहे. समुद्राच्या बाजूचे बांधकाम मेपर्यंत चालू राहील हे लक्षात घेता, दक्षिणेकडील बाजूस ग्रीन नेट बसविण्याचा विचार केला जात आहे.