Mumbai Coastal Road Extension: मुंबईकरांसाठी खुशखबर! कोस्टल रोडचा होणार विस्तार; नरिमन पॉइंट ते विरार प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांत
पहिल्या टप्प्यात 12 मार्च रोजी 10.5 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबईच्या कोस्टल रोड विस्ताराबाबत (Mumbai Coastal Road Extension) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मुंबईतील नरिमन पॉइंटपासून निर्माणाधीन कोस्टल रोड मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. हा रोड पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते विरार प्रवासाचा वेळ केवळ 35 ते 40 मिनिटांपर्यंत कमी होईल. फडणवीस म्हणाले, 'कोस्टल रोड विरारपर्यंत विस्तारण्यासाठी जपान सरकार 54 हजार कोटी रुपये देणार आहे.' वर्सोवा ते मढ लिंकसाठी यापूर्वीच निविदा काढण्यात आली आहे.
फडणवीस यांनी सांगितले, मढ ते उत्तन लिंकचे काम आता सुरू होत आहे. कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील 8-लेन, 29.2 किमी लांबीचा वेगळा एक्स्प्रेस वे आहे, जो दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडतो. त्याच्या पहिल्या टप्प्याचे 11 मार्च 2024 रोजी उद्घाटन झाले, जो प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत 10.58 किमीचा आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 मार्च रोजी दक्षिण मुंबईतील वरळी आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात 12 मार्च रोजी 10.5 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले आणि त्याचा अंदाजे खर्च 12,721 कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी 16,000 हून अधिक वाहनांनी रस्त्याचा वापर केला. (हेही वाचा: Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांना दिलासा! FLY91 ने सुरु केली पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा, जाणून घ्या वेळा)
दुसरीकडे, वांद्रे ते विरारला जोडणाऱ्या सी लिंकला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. कोस्टल रोड वसई-विरारपर्यंत वाढवायचा आहे. वर्सोवा-विरार सी लिंक एमएमआरडीएकडून बांधण्यात येत आहे. अंदाजे 63000 कोटी रुपये खर्चून 43 किमी उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई ते विरार असा कोस्टल रोडचा विस्तार झाल्यामुळे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि दररोज लाखो प्रवाशांना फायदा होईल यावर फडणवीस यांनी भर दिला.