Mumbai: बीएमसी व महाराष्ट्र सरकारने 'कोरोना व्हायरस'संदर्भात जारी केले 24x7 हेल्पलाईन क्रमांक; आता मुंबईत 1916 नंबरवर मिळू शकणार मदत

चीनमधील वुहान येथून बाहेर पडलेल्या या विषाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. संशोधक यावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे

Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

बघता बघता कोरोना विषाणूने (Corona Virus) जगातील अनेक देशांत शिरकाव केला. चीनमधील वुहान येथून बाहेर पडलेल्या या विषाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. संशोधक यावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, देशातील सरकार सर्वांना सतर्क राहण्याचा इशार देत आपल्यापरीने त्यावर उपाययोजना करीत आहे. आता मुंबई महानगपालीका (BMC) व महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) याबाबत 24X7 हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. बीएमसीने मुंबई शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवण्यासाठी 1916 हा नंबर सुरु केला आहे.

महाराष्ट्र सरकारने खास कोरोना व्हायरससाठी हेल्पलाईन क्रमांक '020-26127394' सुरू केला आहे. याबाबत नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'राज्यातील लोकांना कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र जनतेने आता सतर्क असले पाहिजे कारण पुढचे आठ दिवस फार महत्वाचे आहेत.'

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनातही म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. एवढेच नाही तर, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी कोरोना टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचाही हवाला दिला. पीएम मोदींनी यावेळी रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावरून उद्धवजी म्हणाले, 'लोकांनी रंगपंचमीच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. मी पार्थना करतो की, होळीच्या आगीत कोरोना विषाणूही जाळून जावा.' (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन)

उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूबाबत महाराष्ट्र सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे चाचणी सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात पुरेशा प्रमाणात मास्कही उपलब्ध आहेत. मुंबईतील रिक्त सेव्हन हिल्स हॉस्पिटल स्वतंत्र सुविधांसाठी वापरता येईल का ते पहिले जाणार आहे. राज्यातील विविध विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेणाऱ्या कर्मचार्‍यांना कपडे व साफसफाईसाठी आवश्यक वस्तू पुरवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच परदेशी पर्यटक हॉटेल्सना भेट देताना, त्यांची थर्मल तपासणी झाली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनालाही सूचना देण्यात आल्या आहेत.