Mumbai Western Railway Mega Block: 2-3 फेब्रुवारी दिवशी पश्चिम रेल्वेच्या 11 तास मेगाब्लॉक दरम्यान बेस्ट चालवणार चर्चगेट-दादर दरम्यान खास बससेवा, पहा वेळापत्रक

या पार्श्वभूमीवर बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बस धावतील.

BEST bus (Photo Credits: PTI)

डिलाई रोड (Delisle Road Bridge) येथील लोअर परेल (Lower Parel ) पुलाच्या बांधकामासाठी उद्या (2फेब्रुवारी) दिवशी 11 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेची लोकल आणि लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत होणार आहे. या दरम्यान मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून विशेष (BEST Special Bus) बस सेवा चालवण्यात येणार आहे. शनिवार रात्री 10 वाजल्यापासून तीन फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत चर्चगेट - दादर (Churchgate-Dadar) दरम्यान वाहतूक सेवा ठप्प राहणार आहे. 2 आणि 3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; तब्बल 11 तास लोकल सेवा बंद

कोणत्या भागात असेल खास बससेवा?

चर्चगेट - दादर या मार्गावर रेल्वेसेवा बंद ठेवली जाणार असल्याने रात्री उशिरा घरी परतणार्‍या कर्मचार्‍यांना त्रास होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बस धावतील. ही खास बससेवा चर्चगेट ते दादर स्थानका दरम्यान असेल. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर या बससेवेला खास थांबा असेल.

कोणत्या वेळेत धावणार विशेष बस?

शनिवार रात्री 9.30 ते 1.30 या वेळेत विशेष बससेवा असेल. तसेच सकाळी 3.30 ते 10.00 या वेळात खास बस धावणार आहेत.

लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी हा खास ब्लॉक घेण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून या पूलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.