Mumbai Autorickshaw Fare Hike: मुंबईमध्ये रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता; ऑटोरिक्षा युनियनची 2 रुपये भाडेवाढ करण्याची मागणी- Report

30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात या बाबी नमूद केल्या आहेत.

Auto Rickshaw (Photo Credits: PTI)

लवकरच मुंबईमध्ये (Mumbai) रिक्षा (Autorickshaw) प्रवास महागा होण्याची शक्यता आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने उपनगरात चालणाऱ्या ऑटोरिक्षांच्या मूळ भाड्यात 2 रुपये भाडेवाढ करण्यासाठी सरकारकडे औपचारिकपणे विनंती केली आहे. सध्याचे मूळ भाडे 23 रुपये आहे आणि युनियन ते 25 रुपये करण्याची मागणी करत आहे. याआधी मुंबईमध्ये 22 ऑक्टोबर 2022 पासून रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात वाढ झाली होती. त्याद्वारे रिक्षाचे किमान भाडे 23 तर टॅक्सीचे भाडे 28 रुपये झाले.

आता 30 नोव्हेंबर रोजी राज्य परिवहन सचिव आणि राज्य परिवहन विभागाच्या इतर अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात, युनियनचे नेते थॅम्पी कुरियन (Thampy Kurien) यांनी सांगितले की, त्यांची ही नवीन भाडेवाढ करण्याची विनंती वाढत्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे, जी सरकारच्या सूत्रानुसार भाडे समायोजन निर्धारित करण्यात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कुरियन यांनी मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे पाच लाख ऑटो चालकांचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित दरवाढीचे समर्थन केले. याबाबत फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले आहे. (हेही वाचा: पाषाण मुंबई पुणे महामार्गाच्या शेजारी फर्निचर दुकानांच्या अतिक्रमणावर हातोडा)

कुरियन यांच्या म्हणण्यानुसार, वाहनांचा भांडवली खर्च, देखभाल आणि दुरुस्ती खर्च, विमा आणि कर यासह अनेक घटक अलीकडेच वाढले आहेत, ज्यामुळे नवीन भाडेवाढ अपरिहार्य आहे. 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात या बाबी नमूद केल्या आहेत. याबाबत एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरात कोणत्याही भाडेवाढीच्या प्रस्तावाचे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (MMRTA) द्वारे मूल्यांकन केले जाते. ऑक्टोबर 2022 मध्ये, MMRTA ने ऑटोसाठी 2 रुपये आणि टॅक्सींसाठी 3 रुपये भाडे वाढ करण्यास मान्यता दिली होती.