मुंबई: फूटपाथवर राहणार्या असमा शेख या विद्यार्थीनीने महाराष्ट्र बोर्ड 10वी परीक्षेत मिळवले 40% गुण; युवा सेनेकडून पुढील शिक्षणासाठी मदत
असमा शेख (Asma Shaikh) या 17 वर्षीय फूटपाथवर राहणार्या विद्यार्थिनीने महाराष्ट्र बोर्ड 10 वीच्या परीक्षेमध्ये 40% गुण मिळवले आहेत. काल (29 जुलै) महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना तिने आपला संघर्ष सांगताना केवळ वाचता यावं म्हणून अनेक रात्री स्ट्रीट लॅम्प खाली बसल्याचं सांगितलं आहे. त्यावेळेस गर्दी देखील कमी असते. पावसाळ्यात अशाप्रकारे अभ्यास करणं कठीण होतं. मात्र तेव्हा तिचे वडील प्लॅस्टिक कव्हर घेऊन येत असे आणि त्याच्या आधाराने अभ्यास करत असल्याचही तिने म्हटलं आहे. दरम्यान असमाला 40% पेक्षा अधिक गुणांची अपेक्षा होती. मात्र सध्या तिच्या निकालाबद्दल ती खूष आहे.
असमाला पुढे देखील शिकण्याची इच्छा आहे. आर्ट्स विषयामध्ये तिला 10 वीच्या पुढे शिक्षण घ्यायचं आहे. दरम्यान असमाची कहाणी मागील काही तासांत सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील दखल घेत युवासेनेकडून तिला शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या आहे. युवासेना सदस्य राहुल कनंल यांनी असमाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
ANI Tweet
युवासेना कडून मदत
असमाचे वडील सलीम शेख हे मुंबईच्या रस्त्यावर वस्तू विकतात. लिंबू पाणी, भुट्टा सारख्या वस्तू विकून ते पैसे कमावतात. मुलीने कठीण काळातही अभ्यास करून दहावीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.त्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. 'मी वडीलांसोबत मुंबई मध्ये आलो. केवळ पहिलीपर्यंत शिकलो. पण माझ्या मुलीने शिकून तिचं स्थिर आयुष्य मिळवावं' अशी इच्छा असमाच्या वडीलांनी व्यक्त केली आहे.