मुंबई: अनैतिक संबधातून नवजात बालकाला रुग्णालयाच्या शौचालायात सोडले; आईच्या विरोधात गुन्हा दाखल
संबधित बालकाला सोडून जाणाऱ्या त्याच्या आईला शोधण्यात पोलिसांना यश आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजात बालकाला सायन रुग्णालयाच्या Sion Hospital सार्वजनिक शौचालयात (Public Toilet) सोडून गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. संबधित बालकाला सोडून जाणाऱ्या त्याच्या आईला शोधण्यात पोलिसांना यश आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबधित महिलेने अनैतिक संबधातून बाळाला जन्म दिला आहे. महत्वाचे म्हणजे, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाचा संभाळ कसा करायचा यातून या महिलेने धक्कादायक कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी सायन रुग्णालयात अपघात विभागाशेजारी सार्वजनिक शौचालयात प्लास्टीक बकेटमध्ये नवजात बालक सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. याची माहिती नियंत्रण कक्षात कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी एक महिला धावत सार्वजनिक शौचालयात धावत जात असताना आढळली. त्यावरुन पोलिसांना या महिलेवर संशय आला आणि त्यांनी संबधित महिलेचा शोध घ्यायसा सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांना महिलेला शोधण्यात यश आले. सध्या महिला आणि तिचे बाळावर सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हे देखील वाचा-मुंबई: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा तरुणीचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला घटस्फोटीत असून मुंबईतील एका सलूनमध्ये नोकरी करत होती. दरम्यान, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून ती गरोदर राहिली. याबाबत या महिलेच्या घरीच काहीच माहिती नव्हती. यासाठी या महिलेने असे लज्जास्पद कृत्य केले. महिलेने सायन रुग्णालयाच्या शौचालयात जन्म दिला आणि बालकाला तिथेच सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.