Mumbai: विमानतळावरून चालणाऱ्या काली-पीली टॅक्सी चालकांची संपाची हाक; माजी आमदार कृष्णा हेडगे यांनी सीएम एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडल्या समस्या

टर्मिनल 2 आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालणाऱ्या टॅक्सींनी 19 ऑक्टोबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर सर्व खासगी टॅक्सी एग्रीगेटर्स आणि काली-पीली टॅक्सी ऑपरेटर्सचा संपूर्ण मुंबईमध्ये संप असेल.

Mumbai Taxi (PC - ANI/Twitter)

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) टर्मिनल 2 वरून चालणाऱ्या काली-पीली टॅक्सी (Kaali-Peeli Taxi) चालकांनी त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि भाडेवाढीच्या मागणीसाठी 19 ऑक्टोबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावतीने माजी आमदार व शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 3 हजार काली-पीली टॅक्सी चालकांना जगणे कसे अवघड होत चालले आहे, याबाबत व्यथा मांडली आहे.

हेगडे यांनी सीएम शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की टॅक्सी चालकांना ‘कठुआ समितीच्या नियमनाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्यांना मंजूर केलेले भाडे परवडणारे नाही.’

त्यांनी पुढे आरोप केला, ‘टॅक्सी चालकांना दिवसभर वाट पाहावी लागते आणि त्यांना दिवसातून दोन फेऱ्याही मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. याउलट, खाजगी टॅक्सी एग्रीगेटर्सना चांगले भाडे मिळते.’ हेगडे यांनी सरकारकडे विमानतळावरून चालणाऱ्या सर्व काली-पीली टॅक्सी चालकांसाठी प्रति किमी 3 रुपये भाडे वाढवण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, ‘किरकोळ गुन्ह्यांसाठी टॅक्सी आणि रिक्षाचालकांवर अनेक उच्च दंड आकारण्यात आले आहेत. दुहेरी पार्किंगच्या गुन्ह्यासाठी 1500 रुपयांचा दंड आकारला जातो, विशेषत: जेव्हा रिक्षाचालक प्रवाशांच्या निर्देशांचे पालन करतो. असे दंड टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाचालकांना परवडणारे नाहीत.  दंड वेळेवर किंवा त्यापूर्वी भरल्यास मुंबईतील सर्व वाहनांना सूट किंवा सवलत द्यावी, असेही हेगडे यांनी सांगितले. हा ऍम्नेस्टी कालावधी अनेक देशांमध्ये प्रचलित आहे, त्यांनी नमूद केले. (हेही वाचा: Raj Thackeray on Toll Plaza Issue: राज्याच्या एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकार आणि मनसे कॅमेऱ्यांची नजर- राज ठाकरे)

टर्मिनल 2 आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालणाऱ्या टॅक्सींनी 19 ऑक्टोबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर सर्व खासगी टॅक्सी एग्रीगेटर्स आणि काली-पीली टॅक्सी ऑपरेटर्सचा संपूर्ण मुंबईमध्ये संप असेल. याआधी जेव्हा विमानतळ एमआयएएल/जीव्हीके ग्रुपद्वारे चालवले जात होते, तेव्हा हेगडे यांनी काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लॅश स्ट्राइकची हाक दिली होती.