IPL Auction 2025 Live

Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषणाबाबत सरकार ॲक्शन मोडवर; CM Eknath Shide यांनी घेतले मोठे

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करतानाच प्रत्येक भागात रस्ते, पदपथ, गटारं साफ करण्यासाठी दररोज ५० ते १०० कामगार साफसफाईचे काम करतात अशा ठिकाणी अन्य भागातले कामगार तेथे बोलावून साधारणत: एक हजार कामगारांकडून त्याभागाची साफसफाई करून घ्यावी, अशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक भागात डिसेंबर महिन्यापासून मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

सुमारे १०८ स्थानकांच्या माध्यमातून लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. (हेही वाचा: मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन)

मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी, क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सद्य स्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभूमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सार्वजनिक कामाकरीता वापर करता येईल याबाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.