Mumbai: आदित्य ठाकरेंनी साधला CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा; म्हणाले- 'हा जनतेच्या पैशाचा अपव्यय’, जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत.

Aaditya Thackeray | (Photo Credit: Facebook)

वाढत्या प्रदूषणाच्या (Pollution) पातळीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) शहरात एअर प्युरिफायर टॉवर (Air Purifier Towers) बसवण्याचे निर्देश दिले आहे. आता या आदेशाबाबत माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हा ‘जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय’ असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे म्हणतात, ‘मी वर्तमानपत्रात वाचले की प्रदूषणावर बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणजे, बीएमसीला ‘एअर प्युरिफायर टॉवर्स’ लावण्याचा आदेश आहे. प्रदूषण कमी करण्यावर काम करणारे माजी पर्यावरण मंत्री या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, हे टॉवर्स म्हणजे जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘एअर प्युरिफायर टॉवर्सऐवजी सरकारने ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ते म्हणजे- प्रदूषणाचे स्रोत ओळखणे आणि त्यांचे अधिक चांगले आयोजन करणे, प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करणे. या सरकारला या मतलबी आणि स्वार्थी लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांना रोखण्याची हिंमत कोणात नाही.’

ठाकरे म्हणतात, ‘हे टॉवर्स म्हणजे जी समस्या वरवर सोडवता येत नाही, अशा समस्येचे वरवरचे उत्तर आहे. या समस्यांना ओळखून त्यावर उपाययोजना करणारा आमच्या कार्यकाळात तयार केलेला हवामान कृती आराखडा बीएमसीने आधीच बंद केला आहे.’ (हेही वाचा: Wardha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भासाठी घोषणाबाजी, दोघे ताब्यात)

दरम्यान, मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत.