MSRTC Workers Strike: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचा बस स्थानकात खोळंबा; पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, नाशिक येथे वाहतुकीस फटका
कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच एसटी गाड्यांची वाहतूक बंद झाली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. पहाटे चार वाजलेपासून एकही एसटी स्थानकाबाहेर गेली नाही आणि स्थानिकावर आलीही नाही. त्यामुळे प्रवाशी एसटीची वाट पाहत उभे आहेत.
दिवाळी (Diwali 2021) सण तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेतन आणि इतर मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी कालपासून (बुधवार, ता. 27) पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यातील विविध ठिकाणी हे आंदोलन होत आहे. प्रामुख्याने पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur), सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik) या ठिकाणी एसटी कर्मचारी (ST Staff) आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर, नाशिक यांसह इतरही काही ठिकाणी एसटी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे आणि दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांना एसटी (MSRTC) बस सेवा सुरु होणार किंवा नाही याबाबत कोणतीच ठोस माहिती मिळत नसल्यामुळे मनस्ताप सहन करत वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही. प्रामुख्याने लहान मुले, जेष्ठ आणि वृद्ध प्रवासी यांची अवस्था पाहून इतरांची आगतिकता वाढत आहे.
दिवाळी सण हा हिंदू परंपरेत मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणासाठी शहरातून ग्रामीण भागाकडे आणि ग्रामीण भागाकडून शहराकडे मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहतूक आणि प्रवास करतात. शहर ते शहर आणि ग्रामीण भागातून ग्रामीण भागातही होणाऱ्या दैनंदिन प्रवासाचे प्रमाण कमी नाही. असे असताना सणासुदीच्या काळात एसटी बस सेवेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनास्त्र उगारत संप पुकारला आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल राज्य सरकार (State Government) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) दखल घेणार का? याबाबत उत्सुकता आहे. तिढा लवकर न सुटल्यास जनतेतील नाराजी वाढू शकते. तसेच, नागरिकांच्या मनस्तापातही भर पडल्याने त्याचा परिणाम राज्य सरकारबद्दलच्या नाराजीत होऊ शकतो. (हेही वाचा, ST ला मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाकडून एसटीला दुसऱ्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मिळणार; मंत्री अनिल परब यांची माहिती)
प्राप्त माहितीनुसार, राज्यातील विविध संघटनांचा कर्मचारी आंदोलनास पाठिंबा आहे. विविध संघटनांचे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. महागाई भत्ता देण्यात यावा, वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. तसेच, या वेळचे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे अशा मागण्या हे आंदोलक कर्मचारी करत आहेत. पुणे, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूरम आदी ठिकाणीही एसटी कर्मचारी आक्रमक आहेत. त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पुणे येथेही स्वारगेट परीसरात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समिती बेमुदत आंदोलन करत आहे. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर अधिक संप पुकारु असा इशारा क्रमचारी देत आहेत.
एसटी कर्मचारी आंदोलनाचा परीणाम
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा दृश्य परिणाम कोल्हापूरमध्ये ठळक जाणवतो आहे. कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच एसटी गाड्यांची वाहतूक बंद झाली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. पहाटे चार वाजलेपासून एकही एसटी स्थानकाबाहेर गेली नाही आणि स्थानिकावर आलीही नाही. त्यामुळे प्रवाशी एसटीची वाट पाहत उभे आहेत. कोल्हापूर येथून पुणे, सातारा, सोलापूर आणि कोकण, पणजी याशिवाय बेळगाव पर्यंत दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बस ये-जा करत असतात. त्याचा प्रवाशांना फायदा होतो. मात्र, आता संपामुळे एसटी प्रवासाचा मार्गच खुंटला आहे.