ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांसाठी NCMC कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट फक्त कार्डद्वारेच

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य केले असून, १ ऑक्टोबर २०२६ पासून ही अट लागू होणार आहे.

MSRTC | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या या प्रवाशांना यापुढे प्रवासासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' अर्थात NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, 1 ऑक्टोबर 2026 पासून सवलतीचे तिकीट केवळ याच कार्डाद्वारे दिले जाणार आहे. आता NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या या नव्या निर्णयामुळे, एसटी प्रवास प्रणाली पूर्णपणे डिजिटल आणि सुसंगत करण्याच्या दिशेने महामंडळाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

काय आहे नवा निर्णय

एसटी महामंडळाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या पत्रकानुसार, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांसाठी असलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सवलतीचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने देण्यासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सर्व विभाग कार्यालयांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

NCMC कार्ड नोंदणीची प्रक्रिया

ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकडे अद्याप NCMC कार्ड उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना बसमधील ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन) यंत्रावर क्यूआर कोड स्कॅन करून तात्पुरती नोंदणी करता येईल, आणि याच आधारे त्यांना सवलतीचे तिकीट दिले जाईल. मात्र ही तात्पुरती नोंदणी पावती केवळ ३० दिवसांसाठी वैध राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड कार्यान्वित (Active) करून घेणे बंधनकारक आहे.

कार्ड नोंदणी आणि वितरणाची सुविधा 'ई-विनास टेक्नॉलॉजिस लिमिटेड' या कंपनीमार्फत विशेष अधिकृत एजंटांच्या माध्यमातून एसटी आगार आणि कार्यालयांच्या हद्दीत उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना सहज कार्ड मिळू शकेल. NCMC कार्डचं ऑनलाईन रिचार्ज करूनही बॅलन्स दिसत नाहीये? 'या' एका स्टेपशिवाय पैसे कधीच जमा होणार नाहीत! 

टॉप-अपसाठी BHIM App ची सुविधा

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाला दुजोरा देत, NCMC कार्डात रक्कम भरण्यासाठी (टॉप-अप) बीएचआयएम (BHIM) अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. कार्डाच्या मागील बाजूस असलेला क्यूआर कोड बीएचआयएम अ‍ॅपद्वारे स्कॅन करून प्रवाशांना सहज रक्कम भरता येणार आहे. यामुळे रोख रकमेवर अवलंबून न राहता डिजिटल पद्धतीने कार्ड रिचार्ज करणे शक्य होणार आहे.

डिजिटल प्रवासाच्या दिशेने पाऊल

एसटी प्रवासाला अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने NCMC कार्ड प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे महामंडळाने नमूद केले आहे. यामुळे सवलतीच्या तिकिटांचा गैरवापर रोखण्यासही मदत होईल, असे प्रशासनाचे मत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी वेळेत NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून १ ऑक्टोबरपासून त्यांना सवलतीच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement