शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या MSRTC कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार; CM Eknath Shinde यांचे निर्देश

महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही गोष्ट घडली होती. आता या निलंबित करण्यात आलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

संपावर असलेल्या आणि पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढलेल्या आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या सुमारे 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज पार पडली.

पगारवाढ आणि एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर मागण्यांसाठी एमएसआरटीसीचे कर्मचारी जवळपास सहा महिन्यांपासून संपावर गेले होते. त्यानंतर संप मिटवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी वाटाघाटी झाल्या. मात्र, त्यानंतरही संप सुरूच होता. अशात एमएसआरटीसीच्या काही कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लगेचच माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची घोषणा केली होती. (हेही वाचा: 'उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी दिली होती सुपारी'; Narayan Rane यांचा खळबळजनक आरोप)

दरम्यान, महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.