MSRTC Employees Call Off Strike: गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना दिलासा! एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारकडून मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ जाहीर
राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
MSRTC Employees Call Off Strike: आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. ऐन गणपतीमध्ये हा संप पुकारल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते, आता तो मागे घेतल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली.
राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत, एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीच्या महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (हेही वाचा; Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत टोल माफी; राज्य शासनाची घोषणा)
एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीविषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲड. गुणरत्न सदावर्ते, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार श्री. पडळकर यांनी आभार मानले.