MSRTC च्या ताफ्यात पहिल्यांदाच नॉन एसी स्लीपर कोच बस; मुंबई तून कोकणात जाणार 2 गाड्या

यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे. एसी कोच नसला तरीही त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे.

MSRTC | Twitter

MSRTC कडून पहिल्यांदा नॉन एसी स्लिपर कोच बस (Non AC Sleeper Coach) सुरू केल्या आहेत. एसटी ने या बसचे डिझाईन, मॅन्युफॅक्चर स्वतः केले आहे. मुंबई सेंट्रल ते बांदा आणि बोरिवली ते बांदा अशा दोन मार्गांवर ही बस चालवली जाणार आहे. आज बुधवार (4 ऑक्टोबर) पासून या बससेवेचा श्रीगणेशा होणार आहे. नजिकच्या काळात मुंबई आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या राज्य परिवहन मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर स्लिपर कोच बस या मुंबई-गोवा देखील चालवल्या जाणार आहेत.

मुंबई सेंट्रल ते बांदा ही बससेवा पुणे, कोल्हापूर मार्गे जाणार आहे. या बसचं भाडं 1245 रूपये असणार आहे. महिलांसाठी हे भाडं 625 रूपये असणार आहे. संध्याकाळी 6.30 ला बस मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटणार आहे.

दरम्यान बोरिवली- बांदा ही बस महाड, चिपळून मार्गावरून जाणार आहे. या बसचे भाडं 1169 रूपये असणार आहे. महिलांसाठी ते 585 रूपये असणार आहे. ही बस संध्याकाळी 7 वाजता सुटणार आहे. बांदा हा महाराष्ट्राचा शेवट मानला जातो. सिंधुदुर्गातील हे गाव ओलांडल्यानंतर गोवा बॉर्डर सुरू होते.

स्लीपर कोच मध्ये 30 जणांची व्यवस्था आहे. यामध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे. एसी कोच नसला तरीही त्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था आहे. या बसची निर्मिती पुण्याच्या दापोडी वर्कशॉप मध्ये करण्यात आली आहे.