IPL Auction 2025 Live

खासदार सुप्रिया सुळे यांचा 'Parliamentarians Award for Children' ने गौरव

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा, ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे

सुप्रिया सुळे (Photo credit : YouTube)

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा, ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ (Parliamentarians’ Award for Children) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे या नेहमीच राज्यातील शिक्षक, अंगणवाड्या, विशेष मुले यांच्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे सुप्रिया ताईंच्या कामाचा केला गेलेला गौरवच होय.

कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. सुप्रिया सुळे ही अडचण लक्षात घेऊन अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवून देण्याचा कार्यक्रम घेतात. नुकतेच पुण्यात सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली होती. या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली.

अंतरामुळे आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सुप्रिया सुळे दरवर्षी सायकल वाटपाचा कार्यक्रम करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी 10 हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे केलेल्या कामाची दखल घेत सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.