माता न तू वैरिणी! सतत रडते म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने केली आपल्या 2 वर्षांच्या मुलीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

ही मुलगी रोज रडत असे, याच त्रासाला कंटाळून दोघांनी तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह फेकून दिला. आता दापोडी येथील बांधकाम साईटवरून त्यांना अटक करण्यात आली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात (Pune) 2 वर्षाच्या मुलीच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका आईने तिच्या प्रियकरासह आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सापळा रचून दोघांना अटक केली. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, खडकी रेल्वे स्थानकावर 2 मार्च रोजी मुलीचा मृतदेह सापडला होता. हे दोघे मुलीची हत्या करून पसार झाले होते. मात्र गुन्हे शाखेने मुलीच्या शालच्या आधारे या प्रकरणाची उकल केली.

माहितीनुसार, आरोपी महिला लक्ष्मी ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहे. तिचा पती संतोष व्यसनी असल्याने तिचे पतीशी पटत नव्हते. लक्ष्मीचे तिच्या माहेरी नेहमी येणे-जाणे होते. माहेरच्या गावातील संतोष नावाच्या व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. संतोष काही कामानिमित्त पुण्यात आल्याने लक्ष्मीदेखील पुण्यात आली आणि त्याच्याकडेच राहिली. संतोषबरोबर ती दापोडी परिसरात राहत होती.

लक्ष्मीने तिच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलीला सोबत आणले होते. ही मुलगी रोज रडत असे, याच त्रासाला कंटाळून दोघांनी तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह फेकून दिला. आता दापोडी येथील बांधकाम साईटवरून त्यांना अटक करण्यात आली. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा: Pune: पुणे येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, होळीनंतर हातपाय धुताना घटना)

दरम्यान, नुकतेच पुण्यातील विमान नगरमध्ये (Viman Nagar) एका महिलेने आपल्या सुनेचे डोके जमिनीवर ठेचून तिची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. ही सासू आपल्या सुनेवर घरातील काम नीट करत नसल्याचा आणि मुलाची काळजी घेत नसल्याचा आरोप करत असे. दोन दिवसांपूर्वी घरातील कामावरून दोघींमध्ये भांडण झाले. यानंतर सासूने सुनेला मारले आणि तिचे डोके जोरात जमिनीवर आपटले. तिला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.