Monsoon Safety Mumbai: मुंबईत पावसाचा जोर कायम; अंधेरी, चेंबूर, धारावी, वडाळा, मालाड, दहिसर यांसह अनेक भागात वाहतूक बंद
शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
मुंबईत (Mumbai) शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोस्टल कॉलनी (चेंबूर), सक्कर पंचायत रोड, वडाळा वेस्ट, नीलम जंक्शन (चेंबूर), धारावी रेस्टारंट, अंधेरी सबवे, हिंदमाता जंक्शन, सुराना हॉस्पिटल, एसएलआर ब्रिज (चेंबूर), खार सबवे, साईवाडी जंक्शन, अंधेरी मार्केट, मिलन सबवे, शाम तलाव, साईनाथ सबवे, एसव्ही रोड मलाड, दहिसर सबवे, मारोल जंक्शन या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. तसेच अत्यावश्यक प्रवासाचे नियोजन करुन सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहा, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
मुंबईत 24 तासांत 200 मिमी पावासाची नोंद झाली आहे. आजही मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईत पुढील 3 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता आज कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो, अशीही माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 30 पोलिस कोरोना व्हायरसची लागण तर 4 जणांचा मृत्यू
मुंबई पोलिसांचे ट्वीट-
दरम्यान, आज दुपारी 12.23 वाजता पुन्हा एकदा भरती येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून लांब राहावे असे, आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर, पुढील 12 तासांत मुंबई आणि ठाणे येथील पावसाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.