शेतकऱ्यांना खुशखबर! दक्षिण कोकणमध्ये मान्सून दाखल, पुढील 3 ते 4 दिवसांत मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचणार

आज सकाळपासून पावसाने कोकणला झोडपून काढण्यास सुरुवात केली. देशात पहिल्यांदा केरळ राज्यात मान्सूनचे आगमन होते. तर, महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन हे कोकणमधून होते.

Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

Monsoon  2019: आभाळ कधी भरुन येतंय यासाठी गेले प्रदीर्घ काळ आकाशाकडे डोळे लाऊन बसलेल्या महाराष्ट्रातील तमाम जनता आणि शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे. येणार येणार अशी चर्चा असलेला मान्सून अखेर दक्षिण कोकण (South Konkan) प्रांतात दाखल झाला आहे. हाच मान्सून (Monsoon ) पुढे सरकत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राजधानी मुंबई (Mumbai) आणि उर्वरीत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दक्षिण कोकणातील कणकवली, सावंतवाडी, कुढाळ परिसरात पावसाने आज (20 जून 2019) दमदार हजेरी लावली. आज सकाळपासून पावसाने कोकणला झोडपून काढण्यास सुरुवात केली. देशात पहिल्यांदा केरळ राज्यात मान्सूनचे आगमन होते. तर, महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन हे कोकणमधून होते. त्यामुळे कोकणात मान्सूनचे आगमन कधी होते याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागलेले असते. (हेही वाचा, Monsoon Update: 24 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार)

दरम्यान, गेल्या वर्षी वरुनराजा काहीसा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे गेल्या वर्षी फारसा पाऊस झाला नाही. परिणामी गेल्या वर्षी राज्यात दुष्काळ पडला होता. आजही ग्रामिण महाराष्ट्र आणि राज्यातील प्रमुख शहरांना पाणीटंचाई आणि दुष्काळाची छाया गडद आहे. राज्य सरकारने अधिकृतपणे पूर्ण दुष्काळ जाहीर केला नाही. राज्यातील काही भागातच सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकरी अचंबीत झाला आहे. त्यामुळे यंदातरी मान्सून सरी राज्यभरात दमदार कोसळाव्यात ही आपेक्षा आहे.