Money Laundering Case: 'मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये Anil Deshmukh होते मास्टरमाईंड, सर्व कटामागे त्यांचेच डोके, पदाचा केला गैरवापर'; ईडीची उच्च न्यायालयात माहिती
‘देशमुख यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि संपत्तीचा स्त्रोत स्पष्ट करू शकले नाहीत
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचे (Money Laundering) प्रकरण चर्चेत आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंगच्या कटामागे ‘मास्टरमाईंड’ होते. यामागे त्यांचेच डोके होते. त्यांनी आपल्या फायद्यासाठी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुकूल बदल्या आणि नियुक्त्या पार पाडण्यामध्येही देशमुख यांचा मोठा हात असल्याचा आरोपही एजन्सीने केला आहे.
देशमुख यांच्या जामीन याचिकेला उत्तर म्हणून ईडीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ईडीचे सहाय्यक संचालक तसीन सुलतान यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. देशमुख हे एक प्रभावशाली व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव टाकू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी, ‘अर्जदार (देशमुख) हे त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख, सचिन वाझे (बरखास्त केलेले पोलीस अधिकारी), संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे (देशमुख यांचे माजी सहकारी) यांच्यासोबत रचलेल्या संपूर्ण कटाचे सूत्रधार आहेत,‘ असे एजन्सीने म्हटले आहे.
एजन्सीने पुढे असा दावा केला की देशमुख यांनी त्यांच्या सार्वजनिक सेवेत प्रचंड संपत्ती कमावली आणि या संपत्तीचा स्रोत अद्याप अस्पष्ट आहे. ‘देशमुख यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि संपत्तीचा स्त्रोत स्पष्ट करू शकले नाहीत आणि वास्तविक तथ्य लपवत आहेत,’ असे त्यात म्हटले आहे. एजन्सीने पुढे सांगितले की, देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्याचा आरोप आहे. एजन्सीने म्हटले आहे की या प्रकरणाचा तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि म्हणून देशमुख यांचा जामीन मंजूर केल्याने तपासात अडथळा ये. देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर 2021 मध्ये अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. (हेही वाचा: 'बाप बेटे तुरुंगात जाणार', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्लाबोल)
या महिन्याच्या सुरुवातीला विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मागितला आणि ईडीचा खटला खोटा असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकल खंडपीठासमोर शुक्रवारी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.