MNS on Amazon: महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल; राज ठाकरे यांना न्यायालयाकडून आलेल्या नोटीसीनंतर मनसेचा इशारा
यासाठी मनसेने नो मराठी, नो अॅमेझॉन ही मोहिम देखील सुरु केली होती. मात्र यावरुन अॅमेझॉनने कोर्टाचे दार ठोठावले.
अॅमेझॉन वेबसाईट आणि अॅपवर मराठी भाषेचा वापर केला जावा यासाठी मनसे आग्रही होती. यासाठी मनसेने नो मराठी, नो अॅमेझॉन ही मोहिम देखील सुरु केली होती. मात्र यावरुन अॅमेझॉनने कोर्टाचे दार ठोठावले. दरम्यान, दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली असून 5 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिला आहे. यावरुन मनसेचे आक्रमक भूमिका घेतील आहे. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल, असा इशारही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
मनसे अधिकृत ट्विटर हँडलवर तीन ट्विट्स करण्यात आली आहे. यात लिहिले की, व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला. पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय ह्याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. तसंच महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल, असा इशाराही दिला आहे.
MNS Tweets:
दरम्यान, यावरुन मनसे नेते अखिल चित्रे यांनी देखील अॅमेझॉनची मस्ती उतरवणार असल्याचा इशारा दिला आहे. तसंच फ्लिपकार्टने मराठी चा पर्याय सुरु केला असून अमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणारच असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी अखिल चित्रे यांनी माहिम, अंधेरी, वांद्रे, बीकेसी यांसह इतर परिसरात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ अशी पोस्टर्स लावली होती.