MNS vs Amazon: पुणे, मुंबई मधील अॅमेझॉन कार्यालयात मनसैनिकांची तोडफोड; मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक
मुंबईतील चांदवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयांची तोडफोड केल्यानंतर पुण्यातील कार्यालयही फोडण्यात आलं आहे.
अॅमेझॉनच्या (Amazon) वेबसाईट, अॅपवर मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही असलेल्या मनसेने (MNS) आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुंबईतील (Mumbai) चांदवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयांची तोडफोड केल्यानंतर पुण्यातील कार्यालयही फोडण्यात आलं आहे. पुण्यातील (Pune) कोंढवा भागातील अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसैनिकांचा खळ्ळ खट्याक पाहायला मिळाला. त्याबरोबर 'मराठी नाही तर अॅमेझॉन नाही', अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांकडून सुरु होती.
मनसेच्या मराठीच्या हट्टावरुन अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. तसंच 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावरुन मनसे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. (MNS on Amazon: महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल; राज ठाकरे यांना न्यायालयाकडून आलेल्या नोटीसीनंतर मनसेचा इशारा)
दरम्यान, मनसे नेते अखिल चित्रे यांनी यांनी सुरुवातीपासूनच मराठी भाषेच्या वापरावरुन आग्रही भूमिका घेतली होती. परंतु, राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर 'अमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणारच' असा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच त्यांनी त्यापूर्वी माहिम, अंधेरी, वांद्रे, बीकेसी यांसह इतर परिसरात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ अशी पोस्टर्स लावली होती. (MNS on Amazon: फिल्पकार्ट ने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार; राज ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस आल्यावर मनसे नेते अखिल चित्रे यांचा इशारा)
अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मनसेने मागणी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावाही केला. फ्लिपकार्टने या मागणीला मान देत मराठी भाषेचा पर्याय सुरु केला. मात्र अॅमेझॉन याबाबतीत चालढकल करत असून त्यांची चक्क कोर्टात धाव घेतली. इतकंच नाही तर राज ठाकरे यांना कोर्टाने नोटीसही बजावली. यावरुन या वाद अधिकच पेटला आणि मनसेने यावर आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले.